केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिले संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशातील लोक प्रचंड त्रस्त आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारने इंधनाच्या दरांमध्ये कपातीचे संकेत दिले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंधनाच्या किमतीबद्दल सौदी अरेबिया, आखाती देश आणि रशियासोबत चर्चा केली जात असल्याची माहिती दिली आहे.
सौदी अरेबिया, आखाती देश आणि रशियातील पेट्रोलियम मंत्र्यांशी याप्रकरणी बोलत आहोत, आम्ही विविध पातळय़ांवर काम करत आहोत, असे पुरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात केली जाऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील काही काळात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणाम देशातही दिसून येतोय. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पार पोहोचला आहे. तर 12 हून अधिक राज्यांमध्ये डिझेल 100 रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. मे 2020 पासून आतापर्यंत पेट्रोल 36 रुपये प्रतिलिटरने महागले आहे, तर डिझेलच्या दरात 26.58 रुपये प्रतिलिटरने वाढ झाली आहे.









