मुंबई\ ऑनलाईन टीम
तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर २४ ते २८ पैसे प्रति लीटर आणि डिझेलचे दर २६ ते २८ पैसे प्रति लीटरने महागले आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत १०० हून अधिक तर डिझेल ९३.५८ रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे राज्य सरकारकडून म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अजित पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय, त्यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटते. इतर राज्याने त्यांचे टॅक्स कमी केल्यामुळे तिथे १०० रुपयांच्या आत पेट्रोल आहे. राज्याने आधी १० रुपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रुपये कमी करण्याची मागणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे सतत इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राने बोट दाखवणे चुकीचे आहे. राज्य सरकारने कर कमी केला तर इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहतील, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
देशात एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. गॅक, कडधान्य, खाद्य तेलाची देखील किंमती वाढल्या आहे. जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनते समोर आहे. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.५८ रुपये मोजावे लागत आहेत. तर पुण्यामध्ये शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरात अजून आज अजून वाढ झाली आहे.








