मुंबईत पेट्रोल दर 91 पार – डिझेलचे दरही नव्या उच्चांकावर : दहा महिन्यात पेट्रोलदरात 14 रुपये वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या चार-पाच दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर बुधवारी पुन्हा भडकले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बुधवारी पुन्हा एकदा प्रतिलिटर 25 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 91 रुपयांच्या पार गेले आहे. या वाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. या दरवाढीमुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापूर्वी 6 जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 ते 30 पैसे वाढ करण्यात आली होती. इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्मयता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आता मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलचे दर नव्वदीपार गेले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती, परंतु बुधवारी सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 25 पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या 10 महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 ते 30 पैशांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91.07 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलची किंमत 81.34 रुपये प्रतिलिटर झाली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 84.45 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 74.63 रुपये झाली आहे.
देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचे हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. कच्चे तेल प्रतिबॅरल 53.50 डॉलर वर पोहोचला आहे. तर बेंट क्रूड ऑईल प्रतिबॅरल 56.58 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहे.
काही निवडक शहरांमधील दर…
शहर डिझेल पेट्रोल
मुंबई 81.34 रु. 91.07 रु.
दिल्ली 74.63 रु. 84.45 रु.
कोलकाता 78.22 रु. 85.92 रु.
चेन्नई 79.95 रु. 87.18 रु.









