आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ः पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आशियातील सर्वात मोठा बायो सीएनजी प्रकल्प मध्यप्रदेशमधील इंदोर येथे साकारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होत या प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. इंदोर येथील टेन्चिंग ग्राऊंड येथील 15 एकर जागेवर सीएनजी प्रकल्प उभारण्यात आला असून याद्वारे शेतकऱयांसाठी जैविक खताची निर्मितीही होणार आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा आशियातील सर्वात मोठा बायो नॅचरल गॅस सीएनजी प्रकल्प आहे.
मध्यप्रदेश प्रशासनाकडून लोकार्पण कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंदोर येथील बायो सीएनजी गॅस प्लान्टचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार पंतप्रधान या सोहळय़ात सहभागी होणार आहेत.
तीन टप्प्यात गॅसनिर्मिती
बायो नॅचरल गॅस सीएनजी प्रकल्पातून एकूण तीन टप्प्यात गॅसनिर्मिती होणार आहे. पहिल्यांदा डायजेस्टर, त्यानंतर बॅलून आणि अखेरीस काँप्रेस्ड अशा तीन टप्प्यात गॅस तयार होईल. त्यानंतर शुद्ध मिथेन गॅस रिफिल सेंटरमध्ये पाईपलाईनच्या मदतीने पोहचवण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासन या सीएनजी गॅसचा वापर सार्वजनिक ट्रान्स्पोर्टसह कॉर्पोरेशनच्या बसमध्ये करणार आहे. जवळपास 400 बसमध्ये सीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामधून शहरातील जवळपास 300 ते 400 बस चालवण्याचे उद्दिष्ट आहे.









