तरुण-तरुणींच्या टोकदार दातांना केले जाते चपटे
कुठल्याही प्रथेला योग्य किंवा अयोग्य या मापदंडात मापणे चुकीचे आहे. इंडोनेशियातील एका गावात लोकांच्या टोकदार दातांचे घर्षण करून त्यांना चपटे करण्यात येते. दक्षिण बालीतील एका गावात अनेक वर्षांपासून दातांना घासून चपटे करण्याची प्रथा चालत आली आहे. माणसांच्या तोंडात अनेक प्रकारचे दात असतात.
सर्वसाधारपणे मानवी तोंडात चार टोकदार दात असतात, ज्यांना केनाइन म्हटले जाते. हे केनाइन दात मांस किंवा टणक खाद्यपदार्थ खाताना उपयोगी पडतात. या दातांचेही देखील अत्यंत महत्त्वाचे कार्य असते, परंतु बालीच्या या गावात या दातांना घासून चपटे करण्यात येते.

फ्रान्सच्या एका छायाचित्रकाराने दातांना घासण्याच्या या पूर्ण प्रथेची एक फोटो सीरिज जारी केली होती. ही प्रथा का आणि कशाप्रकारे केली जाते हे त्याने विस्तृतपणे मांडले होते. माणसाच्या आत सैतान आणि देव दोघांचाही वास असतो. या प्रथेद्वारे सैतानाला संपविले जाते असे बालीच्या लोकांचे मानणे आहे. टोकदार दात हे प्राणी किंवा वाईटाचे प्रतीक आहेत. त्यांना घासून कमी टोकदार केले जाते. या प्रथेद्वारे माणसांमधील द्वेष, अभिमान किंवा इतरांसाठी वाईट चिंतण्याची भावना संपविली जाते.
कशी पार पडते प्रथा?
5 व्या शतकात इंडोनेशियात सनातन धर्म पोहोचल्यापासून ही प्रथा चालत आली आहे. युवकाचा आवाज भारदस्त होऊ लागल्यावर आणि युवतीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर या प्रथेला सामोरे जावे लागते. ही प्रथा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी युवक-युवती प्रार्थना करू लागतात. त्यानंतर एक पंडित फाइलरचा वापर करत दातांना आकार देतो. या प्रथेत कुटुंबीय आणि मित्र जमा होतात आणि याला विवाहासारख्या विशेष विधीप्रमाणे पूर्ण केले जाते. विधी सुरू होण्यापूर्वी रुबीच्या अंगठीला दातांनी स्पर्श केला जातो, याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानतात. विधी पूर्ण झाल्यावर जल्लोष केला जातो.









