डॉ. सिद्धराम महास्वामीजींचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव हे शहर कर्नाटकातच नव्हे तर देशातील एक सुंदर शहर म्हणून नावाजले जाते. या सुंदर शहराला सुंदर करण्यामध्ये इंजिनिअर्सचा फार मोठा वाटा आहे. डॉ. एम. विश्वेश्वरय्या, एस. जी. बाळेकुंद्री यांच्यासारख्या इंजिनिअरनी प्रामाणिक व निस्वार्थी सेवेमुळे आपले नाव देशभरात पोहोचविले. त्यांची ही प्रेरणा घेऊन प्रत्येकांनी आपली सेवा बजावावी, असे प्रतिपादन गदग येथील तोंटदाचार्य मठाचे मठाधीश डॉ. सिद्धराम महास्वामी यांनी केले.
कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बेळगावचा रौप्यमहोत्सव कार्यक्रम शनिवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नागनूर रुदाक्षी मठाचे मठाधीश अल्लमप्रभू स्वामी, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ, इव्हेंट चेअरमन महेश हेब्बाळे व संजीव हंपण्णावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार अनिल बेनके म्हणाले, बेळगावचे सुंदर रूप स्मार्ट सिटीमुळे आपल्या समोर येत आहे. शहर सुंदर करायचे हे इंजिनिअरच्या हातात असते. त्यामुळे प्रत्येक इंजिनिअरने प्रामाणिकपणे आपले काम केले पाहिजे. 10 रुपये, 100 रुपये 500 रुपये बाँण्डवरील खरेदी बंद केल्यास सरकारलाही कर मिळणार आहे. त्यामुळे अशी बाँण्डवरील खरेदी-विक्री बंद करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित इंजिनिअर्सना केले.
खासदार मंगला अंगडी यांनी कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स संघटनेला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, एखादी संस्था मोठी करण्यासाठी अनेक जणांची मेहनत लागते. आज या संघटनेचा वटवृक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वामीजींच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी पाटील व मल्लिकार्जुन मुदनूर यांनी केले. महेश हेब्बाळे यांनी आभार मानले. यावेळी उमेश सरनोबत, आनंद कुलकर्णी, विनय बेहेरे, मल्लिकार्जुन मुदनूर यांच्यासह कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे सदस्य व बेळगाव परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.









