वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
सामनावीर जोस बटलरच्या नाबाद 77 धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने रविवारी येथे दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात चेंडू बाकी ठेवून 6 गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली.
इंग्लंडने गेल्या शुक्रवारी या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केवळ दोन धावांनी नाटय़मयरित्या पराभव केला होता. या दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 157 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 4 गडय़ांच्या मोबदल्यात 158 धावा जमवित मालिका हस्तगत केली. इंग्लंडचा संघ आता ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी 18 धावांची जरूरी असताना झंपाने टाकलेल्या 19 व्या षटकांतील 5 चेंडूवर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इंग्लंडच्या मोईन अलीने झंपाच्या षटकांत सलग दोन चेंडूवर षटकार आणि चौकार खेचला. त्यानंतर बटलरने उत्तुंग विजयी षटकाराने ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. बटलरने 54 चेंडूत दोन षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 77 धावा जमविल्या. टी-20 प्रकारातील बटलरची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 4 वर्षांपूर्वी बटलरने लंकेविरूद्धच्या सामन्यात नाबाद 73 धावांची खेळी केली होती. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बेअरस्टोने स्टार्कच्या षटकांत 2 चौकार ठोकले पण त्यानंतर तो फटका मारण्याच्या नादात 19 धावांवर स्वयंचित झाला. त्यानंतर बटलरने रिचर्डसनला षटकार तसेच डेव्हिड मलानने मॅक्सवेलच्या षटकात सलग दोन चौकार मारले. बटलर आणि मलान यांनी 87 धावांची भागिदारी केली. ऍगेरने मलानला 42 धावांवर झेलबाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये बळी मिळविण्यासाठी झगडावे लागले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरने ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे खातेही उघडले नव्हते. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळालेला कॅरे मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दुसऱया षटकांत ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 3 अशी केविलवाणी होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला स्मिथ क्यूरेनच्या गोलंदाजीवर षटकार मारला पण चोरटी धाव घेण्याच्या नादात स्मिथ कर्णधार मॉर्गनकरवी धावचीत झाला. आता या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 157, इंग्लंड 18.5 षटकांत 4 बाद 158 (बटलर नाबाद 77, मलान 42).









