वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला यापूर्वी हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. या दुखापतीने पुन्हा उचल खाल्याने न्यूझीलंडविरूद्ध होणाऱया आगामी कसोटी मालिकेत त्याच्या सहभागीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. या दुखापतीमुळे आर्चरला आणखी काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागणार आहे.
इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्स आणि केंट यांच्यातील सामन्यात खेळताना 26 वर्षीय आर्चरची ही दुखापत पुन्हा चिघळली. गेल्या काही दिवसांपासून या दुखापतीचा आर्चरला वारंवार त्रास होत आहे. भारताविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यात तसेच त्यानंतर भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेलाही त्याला मुकावे लागले होते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा येत्या मंगळवारी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेलाही इंग्लंडमध्ये प्रारंभ होणार आहे. त्यावेळपर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी इंग्लंडची अपेक्षा आहे.









