वृत्तसंस्था/ मेलबर्न
इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असून उभय संघात ऍशेस मालिका खेळविली जात आहे. इंग्लंड संघाचे प्रमुख प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना त्यांच्या कुटुंबियासमवेत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
या ऍशेस मालिकेतील चौथी कसोटी येत्या बुधवारपासून सिडनीमध्ये खेळविली जाणार आहे. मात्र प्रशिक्षक सिल्व्हरवूड यांना ही कसोटी कोरोना समस्येमुळे हुकणार आहे. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी होबार्ट येथे खेळविली जाणार असून या कसोटीवेळी सिल्व्हरवूड इंग्लंड संघाबरोबर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 8 जानेवारीपर्यंत ख्रिस सिल्व्हरवूड आणि त्यांच्या कुटुबिय सदस्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.









