मँचेस्टरमधील तिसरी व शेवटची कसोटी : स्टुअर्ट ब्रॉडचे जलद अर्धशतक, केमर रोशचे 72 धावात 4 बळी,
मँचेस्टर / वृत्तसंस्था
स्टुअर्ट ब्रॉडने अवघ्या 45 चेंडूत 9 चौकारांसह 62 धावांची जलद खेळी साकारल्यानंतर या बळावर यजमान इंग्लंडने येथील तिसऱया व शेवटच्या निर्णायक कसोटी सामन्यातील दुसऱया दिवशी उपाहाराअखेर सर्वबाद 369 धावांची मजल मारली. 4 बाद 258 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर त्यांनी सलग 4 षटकात सलग बळी गमावले आणि पाहता पाहता त्यांची 8 बाद 280 अशी पडझड झाली होती. मात्र, ब्रॉडच्या फटकेबाजीमुळे पुन्हा एकदा चित्र पालटले.
पोप (150 चेंडूत 91) व बटलर (142 चेंडूत 67) यांच्या खात्यावर पाचव्या गडय़ासाठी 140 धावांची भागीदारी नोंद झाली. 91 धावांवर नाबाद राहिलेला ऑलि पोप एकाही धावेची भर न घालता सर्वप्रथम बाद झाला. या पडझडीनंतर स्टुअर्ट ब्रॉडने सूत्रे हातात घेत ओल्ड ट्रफोर्ड मैदानाच्या चौफेर फटकेबाजीचा जोरदार सिलसिला सुरु केला. त्याने आपले अर्धशतक अवघ्या 33 चेंडूतच साजरे केले. इंग्लंडतर्फे सर्वकालीन सर्वात जलद कसोटी अर्धशतक झळकावणाऱया फलंदाजांच्या यादीत तो तिसऱया स्थानी विराजमान झाला.
ब्रॉडची 45 चेंडूतील खेळी व्हॉलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकल्यानंतर संपुष्टात आली. पण, तोवर वर्चस्व गाजवून देण्याचा त्याचा इरादा बऱयाच अंशी यशस्वी ठरला. त्याने डॉम बेससमवेत नवव्या गडय़ासाठी 76 धावांची दमदार भागीदारी साकारली, हे देखील इंग्लंडच्या या पहिल्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. ब्रॉडच्या अर्धशतकी खेळीत 9 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. चेसच्या गोलंदाजीवर ब्लॅकवूडने त्याचा झेल टिपला.
रोशचे कसोटीत 200 बळी

शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसन 11 धावांवर बाद झाला तर सहकारी फलंदाज बेस 55 चेंडूत 18 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने या सत्रात 111 धावांची भर घातली.
तत्पूर्वी, पोपला शेनॉन गॅब्रिएलच्या षटकात स्लीपकडून जीवदान मिळाले. पण, नंतर पोप गॅब्रिएलच्या गोलंदाजीवरच त्रिफळाचीत झाला. ख्रिस वोक्सने (1) बाहेर जाणाऱया चेंडूला यष्टीवर ओढवून घेतले. केमर रोशचा हा 200 वा कसोटी बळी ठरला. 56 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात करणाऱया जोस बटलरने 67 धावांपर्यंत मजल मारली. नंतर तो गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर दुसऱया स्लीपमध्ये जेसॉन होल्डरकडे झेल देत बाद झाला. होल्डरनेच रोशनच्या गोलंदाजीवर जोफ्रा आर्चरचाही (3) झेल टिपला. रोशने डावाअखेर 72 धावात 4 बळी असे पृथ्थकरण नोंदवले. पुढे विंडीजने चहापानाअखेर 25 षटकात 3 बाद 59 धावांपर्यंत मजल मारली होती.
कसोटीला निर्णायक स्वरुप
या मालिकेत साऊदम्प्टन येथील पहिली कसोटी जिंकणाऱया विंडीजला इंग्लंडने मँचेस्टरमध्ये दुसऱया कसोटीत धूळ चारली व त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. साहजिकच, या तिसऱया व शेवटच्या कसोटीला निर्णायक स्वरुप आले आहे. विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये 1988 नंतर प्रथमच एखादी कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 111.5 षटकात सर्वबाद 369 (ऑलि पोप 150 चेंडूत 11 चौकारांसह 91, जोस बटलर 142 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 67, रोरी बर्न्स 147 चेंडूत 4 चौकारांसह 57, स्टुअर्ट ब्रॉड 45 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह 62. अवांतर 22. केमर रोश 25.4 षटकात 4-72, शेनॉन गॅब्रिएल 23.2 षटकात 2-77, रोस्टन चेस 11 षटकात 2-36, जेसॉन होल्डर 24.5 षटकात 1-83).
विंडीज पहिला डाव (चहापानाअखेर) : 25 षटकात 3-59 (जॉन कॅम्पबेल 50 चेंडूत 3 चौकारांसह 32, शाय होप 64 चेंडूत 17, क्रेग ब्रेथवेट 1, ब्रूक्स नाबाद 4, चेस नाबाद 0. अवांतर 5. अँडरसन, ब्रॉड, आर्चर प्रत्येकी 1 बळी).









