पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी, रूट सामनावीर
वृत्तसंस्था/ गॅले
येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने लंकेचा 7 गडय़ांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जॉनी बेअरस्टो व डॅन लॉरेन्स यांनी आणखी पडझड होऊ न देता 52 धावांची अभेद्य भागीदारी करून इंग्लंडचा विजय साकार केला. कर्णधार जो रूटला सामनावीराचा बहुमान मिळाला.
इंग्लंडला विजयासाठी केवळ 74 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. पण चौथ्या दिवशी त्यांची 3 बाद 14 अशी पडझड झाल्यानंतर इंग्लंडच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण बेअरस्टो व लॉरेन्स यांनी सावध फलंदाजी करीत चौथ्या दिवशीअखेर 3 बाद 38 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. पाचव्या दिवशी या धावसंख्येवरून त्यांनी खेळाला सुरुवात केली आणि उर्वरित 36 धावा काढत त्यांनी विजय साकारला. बेअरस्टो 65 चेंडूत 35 तर लॉरेन्स 21 धावांवर नाबाद राहिले. लॉरेन्सने पहिल्या डावात अर्धशतक नोंदवले होते.
सोमवारच्या खेळात लंकेला लवकर ब्रेकथ्रू मिळविण्याची चांगली संधी मिळाली होती. दिवसातील तिसऱया षटकांत दिलरुवान परेराच्या ऑफस्पिनवर बेअरस्टो पायचीत झाला होता. पण हंगामी कर्णधार दिनेश चंडिमलने डीआरएस घेण्याचे टाळल्याने त्यांची ही संधी वाया गेली. बेअरस्टोनेच अखेरीस परेराला स्वीपचा विजयी चौकार मारत सामना संपवला. या सामन्यात लंकेचा पहिला डाव 135 धावांत आटोपला होता. पण दुसऱया डावात त्यांनी सुधारित फलंदाजी करीत 286 धावांची पिछाडी भरून काढत 359 धावा जमविल्या आणि इंग्लंडला दुसऱया डावात मैदानात उतरण्यास भाग पाडले. उभय संघांतील दुसरी कसोटी याच मैदानावर शुक्रवारपासून सुरू होणार आहे. 2018 मध्ये इंग्लंडने लंका दौऱयात 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला होता.
संक्षिप्त धावफलक ः लंका प.डाव 135, इंग्लंड प.डाव 421, लंका दु.डाव 359, इंग्लंड दु.डाव 24.2 षटकांत 3 बाद 76 ः क्रॉली 8, सिबली 2, बेअरस्टो नाबाद 35, रूट 1, लॉरेन्स नाबाद 21, अवांतर 9. गोलंदाजी ः एम्बुल्डेनिया 2-29, परेरा 0-34, डी सिल्वा 0-4.









