गुवाहाटी / वृत्तसंस्था
निवडणूक काळात केंद्रीय संस्थांकडून घातलेल्या धाडींमध्ये 110 कोटी रूपयांची साधने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या रकमेचा तसेच भेटवस्तूंचा उपयोग मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी करण्यात येणार होता. इतक्या प्रमाणात वस्तू आणि रक्कम हाती लागणे हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
आसामचे केंद्रीय निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी ही माहिती दिली. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 20 कोटी रूपयांच्या वस्तू अगर रोख रक्कम हाती लागली होती. यंदा निवडणूक आयोगाने अधिक कठोर धोरण अवलंबिल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात धाडी घालण्यात आल्या आहेत.
हस्तगत करण्यात आलेल्या 110.83 कोटींच्या वस्तूंमध्ये 34.29 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ, 33.44 कोटी रूपयांचे मद्य, 24.50 कोटी रूपये रोख रक्कम, 3.68 कोटी रूपयांचे सोने व सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांमधून या वस्तू जप्त करण्यात आल्या असून या कारवायांमध्ये आसाम पोलीस, केंद्रीय सुरक्षा दले आणि फ्लाईंग स्क्वाडस् यांचा सहभाग होता. वरील वस्तूंशिवाय विदेशी सिगारेट्स्, गांजाच्या बिया, काळी मिरी, काही प्रकारचा सुकामेवा, पान मसाला अशा 14.91 कोटी रूपयांच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या, अशी माहिती खाडे यांनी दिली.









