गुवाहाटी
पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले दोन आमदार राजदीप गोवाला तसेच अजंता नियोग यांनी मंगळवारी राज्याचे मंत्री हिमंता विश्व शर्मा यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काँग्रेसमध्ये शिस्त नसून पक्ष दिशाहीन झाला आहे. काँगेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला तळागाळातील कार्यकर्त्यांची पर्वा नसल्याचे उद्गार नियोग यांनी काढले आहेत. तर काँग्रेस पक्षात दूरदृष्टी नसल्याचा दावा गोवाला यांनी केला आहे. अजंता नियोग भाजपमध्ये सामील होणार असल्याचे कयास दीर्घकाळापासून वर्तविण्यात येत होते. पक्षविरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करत नियोग यांची काँग्रेसमधून शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली होती. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि मंत्री शर्मा यांची भेट घेतल्याप्रकरणी नियोग यांना यापूर्वी पक्षातील एका महत्त्वाच्या पदावरून हटविण्यात आले होते. गोलाघाटच्या 4 वेळा आमदार राहिलेल्या अजंता नियोग मंत्रीही राहिल्या आहेत. आसाममध्ये a मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. 126 विधानसभेत 60 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर त्याचे सहकारी आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स प्रंटचे अनुक्रमे 14 आणि 12 आमदार आहेत. तर काँग्रेसचे सध्या 22 आमदार आहेत. तर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटचे 14 आमदार आहेत.









