आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने नामघरांकरता मोठी घोषणा करून राजकीय जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील 500 वर्षांपासून आसामच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिलेल्या नामघरांसाठी सर्वानंद सोनोवाल सरकारने प्रत्येक अडीच लाख रुपयांची मदत दिली आहे. या नामघरांशी संबंधित कुटुंबे भाजपच्या दिशेने वळू शकतात असे मानण्यात येत आहे. 5 शतकांपूर्वी शंकरदेव यांनी आसाममध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या स्वरुपात नामघरांची सुरुवात केली होती. तेव्हापासून ही नामघरं आसामच्या सांस्कृतिक चेतनेसह एकरुप झाली आहेत. आसामच्या प्रत्येक गावात नामघर असून शहरांमधील गल्ल्यांमध्येही त्यांचे अस्तित्व दिसून येते.
पूर्ण आसाममध्ये 50 हजारांपेक्षा अधिक नामघरं असून याचा प्रभाव असलेल्या लोकांची संख्या लाखांमध्ये आहे. काळासोबत उपेक्षेचे धनी ठरल्याने या नामघरांची स्थिती दयनीय झाली होती. कुठल्याही सरकारने या नामघरांची दखल घेतली नव्हती. अनेक ठिकाणी तर नामघरांवर अवैध कब्जा झाला होता.

मागील वर्षी भाजप सरकारने या नामघरांना अतिक्रमणापासून मुक्त करत त्यांच्या पुनर्निर्मितीचा निर्णय घेतला होता. ऑगस्टमध्ये 8756 नामघरांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. अन्य नामघरांची ओळख पटविण्यात येत असून भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास त्यांचा जीर्णोद्धारही केला जाऊ शकतो. भाजप नामघरांना पुनर्जीवित करण्यासाठी संकल्पबद्ध असून याकरता निधीची कमतरता पडू दिली जाणार असल्याचे भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी म्हटले आहे.
नामघराचे स्वरुप
नामघरात एक मोठे सभागृह असते, तेथे कुठलीच मूर्ती नसते. तेथे शंकरदेव यांच्याकडून लिहिलेले भागवत ठेवण्यात येते. वैष्णव परंपरेतील संत शंकरदेव यांनी नामघरांमध्ये भजन-कीर्तन, सांस्कृतिक आयोजन आणि परिसरातील लोकांदरम्यान शैक्षणिक कार्ये सुरू केली होती.









