लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई
लखीमपूर खेरी / वृत्तसंस्था
येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या शेतकऱयांच्या अंगावर कार घालून त्यांना मारण्याच्या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती, तेव्हा स्थानिक न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. मात्र चौकशीत त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने आणि हिंसाचाराच्या ठिकाणी तो उपस्थित होता, असे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्याचा रिमांड मागितला होता. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी दिला.
आशिष मिश्रा याला कोठडीत मारहाण करु नये आणि चौकशीच्या वेळी त्याच्या वकिलाला उपस्थित राहण्याची मुभा देण्यात यावी, या अटींवर पोलीस कोठडी देण्याचा निर्णय मुख्य दंडाधिकारी चिंताराम यांनी दिला. आशिष मिश्रा याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. शेतकऱयांचा मृत्यू घडल्याची घटना घडली तेव्हा तो घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र तो तेथे उपस्थित होता असे दाखविणारे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असे सांगण्यात येते. त्यामुळे त्याची अधिक चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, असा पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता.
काँगेसचा आरोप
काँगेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर मिश्रा याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. आशिष यांची सुटका करता यावी यासाठीच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलेले नाही, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे.









