अमित शाह यांचे सीआरपीएफ जवानांना आवाहन : 83 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपस्थिती
वृत्तसंस्था / श्रीनगर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 83 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. जम्मूच्या एमए स्टेडियमवर सीआरपीएफची रायझिंग डे परेड पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भविष्यातील दिशा ओळखून जवानांनी नेहमीच सज्ज राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. शत्रूराष्ट्रांपासून असलेले धोके विचारात घेऊन सुरक्षा दलांनी भविष्यातील ‘रोडमॅप’ निश्चित केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी संध्याकाळी गृहमंत्र्यांनी राजभवनात उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या पाच महिन्यांतील शाह यांचा हा दुसरा जम्मू दौरा आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बरीच सुधारली असल्याचे गृहमंत्री शाह यांनी जवानांना संबोधित करताना स्पष्ट केले. तसेच आपल्या सैन्याने राज्यातील दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याबद्दल सुरक्षा दलाचे कौतुक केले. राज्यातील दहशतवादी कारवायांमध्ये बरीच घट झाली असून आतापर्यंत हे आपल्या जवानांचे मोठे यश असल्याचे ते पुढे म्हणाले. सीआरपीएफ स्थापना दिन कार्यक्रमात परेडचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी सीआरपीएफची वार्षिक परेड देशाच्या विविध भागात साजरी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. देशाच्या आणि सीमांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सैनिक देशाच्या विविध भागात जाऊन जनतेशी जिव्हाळय़ाचे नाते निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे शाह यांनी नमूद केले.








