
नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱया विविध बांधकाम प्रकल्पातून 3 कोटीहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकताच वर्तवला आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने आयोजीत केलेल्या वेबीनारमध्ये ते बोलत होते. पीएमएवाय शहरी योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रकल्पात 1.65 कोटी लोकांना सध्याला रोजगार प्राप्त झाला आहे. गृहबांधणी उद्योग मंत्रालयाने 1.12 कोटी घरांच्या मागणीपैकी 1.07 कोटी घरांना मंजुरी मिळवून दिली आहे. याअंतर्गत 67 लाख घरांचे काम हाती घेण्यात आले असून 35 लाख घरांचा पुरवठा करण्यात आला आहे. येणाऱया काळात या क्षेत्रात 3.65 कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितलं.
रूची सोयाचे पद आचार्य बाळकृष्ण यांनी सोडले

मुंबई : रूचि सोयाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून आचार्य बाळकृष्ण यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. कंपनीच्या कार्यवाहीचा भाग म्हणून त्यांनी पद सोडलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 13 टक्के इतका घटला आहे. आता त्यांच्या जागी नवे एमडी म्हणून राम भारत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 12.25 कोटी रुपये होता. मागच्या वर्षी याच कालावधीत नफा 14.01 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही कमी झाले असल्याचे समजते. मागच्या वर्षी एकूण उत्पन्न 3 हजार 125.65 कोटी रुपयांवर होते, तर यावर्षी ते कमी होऊन 3 हजार 57 कोटी रुपयांवर घसरले आहे. नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी आता राम भारत हे पदभार सांभाळणार आहेत. 19 ऑगस्ट ते डिसेंबर 2022 पर्यंत ते आपले पद सांभाळणार आहेत.
हार्ले डेव्हीडसन गाशा गुंडाळणार

नवी दिल्ली : मजबुत दुचाकी मोटारसायकलच्या विश्वात नाम कमावणारी कंपनी हार्ले-डेव्हिडसन आपला भारतातील व्यवसाय गुंडाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यातील घटणारी मागणी आणि विक्रीत झालेली घट या कारणास्तव कंपनी इथला गाशा गुंडाळणार असल्याचे समजते. मुळच्या अमेरिकेतील कंपनीचा हरयाणात बावल येथे वाहन जोडणीचा कारखाना आहे. पण अलीकडच्या काळात मागणी घटली असल्याने कारखाना बंद करण्याचा विचार केला जात आहे. कंपनीने आपले 50 टक्के लक्ष्य उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया पॅसिफीकच्या देशांवर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. ज्या देशात विक्री कमी आणि नफा कमी आहे अशा देशांमधून माघार घेण्याचा विचार कंपनी करते आहे. मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने भारतात 2 हजार 500 दुचाकी विक्री केल्या आहेत. एप्रिल-जून 2020 च्या कालावधीत 100 बाइक्सची जेमतेम कंपनीने विक्री केली असल्याचे सांगण्यात येते. भारतातील ही सर्वात खराब कामगिरी असल्याची प्रतिक्रीया कंपनीने दिली आहे.








