सिंधुदुर्ग/प्रतिनिधी
आवानओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत कवी सफरअली इसफ यांचा गौरव सोहळा शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायं.6 वा.त्यांच्या गावी तिथवली (वैभववाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत कवी समीक्षक गोविंद काजरेकर यांच्या हस्ते सफर यांना गौरविण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
नीट चालता–बोलता न येणारा हा दिव्यांग कवी गेली तीस वर्षे निष्ठेने कविता लेखन करत आहे. अजून पुस्तक रूपात एकत्रित संकलित करता न आलेल्या या कवीला मात्र आपल्या कवितेतून लख्ख उघड्या डोळ्यांनी आजचा भवताल पाहता येतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही समाज विभाजनाला धर्म सत्ताच कारणीभूत असल्याचा इतिहास आहे. अलीकडील काळ
तर याचे ज्वलंत उदाहरण आहे. या दांभिक मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधातला आजच्या मराठी कवितेतील सशक्त आवाज म्हणून आपल्याला सफरअली यांच्या कवितेकडे पाहता येते. धर्मवेडाने फक्त हिंसाच घडत नाही तर त्या हिंसेचे व्रण किती खोलवर रुतून राहतात आणि फाळणी एकदाच होते पण फाळणीत दुभंगलेला अल्पसंख्याक समाज आयुष्यभर आपल्याच भूमीत उपरेपणाची भावना मनात सलती ठेवून कसा जगतो याची तीव्र जाणीव सफर यांची कविता करून देते. जी आज अतिशय गरजेची आहे.
कविता लिहीण्यासाठीही अपार कष्ट घ्यावे लागतात याची प्रचिती ते आपल्या अपंगत्वावर मात करून लिहीत असलेल्या लेखनातून येत आहे. या गुणवंत कवीच्या कविता मुराळी, कविता–रती, वाड:मय वृत्त अशा महत्त्वाच्या नियतकालिकातून प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलन त्यांना कविता वाचनासाठी निमंत्रितही केले जात असते. त्यांना अलीकडेच महात्मा फुले साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या सर्व पार्श्वभूमीवर आवानओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे त्यांचा हा गौरव करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील साहित्यिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किशोर कदम (9422963655) यांच्याशी संपर्क साधा.