वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
अलतगा येथील लक्ष्मीदेवी मंदिराचा दरवाजाचा कुलूप तोडून देवीच्या अंगावरील अर्ध्या तोळ्याचे दागिने चोरटय़ांनी चोरी केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील मंदिरे चोरटय़ांनी लक्ष्य बनविल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले. तेव्हा मंदिराच्या दरवाजाचा कुलूप तोडल्याचे दिसून आले. पुजारीने लागलीच ही घटना देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्या कानावर घातली. मंदिरामध्ये येऊन पाहणी केली असता देवीच्या अंगावरील सोन्याचे दोन शिंपल्याचे व सोन्याचे मणी चोरटय़ांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी सदर घटनेबद्दल काकती पोलीस स्थानकात कळविल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.
अंधाराचा गैरफायदा घेतला
मंदिरमध्ये चोरी झालेल्या रात्री गावचे विद्युत ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यामुळे संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे संपूर्ण गाव अंधारामध्येच होते. याच संधीचा चोरटय़ांनी फायदा घेऊन चोरी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पोलीस खात्याने त्वरित तपास करून चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी करण्यात येत आहे..









