मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
या आर्थिक वर्षात मंजूर झालेली सर्व कामे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा, अशी सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे. शिमोगाच्या शिकारीपूर येथील केडीपी बैठकीत ते बोलत होते.
मोठय़ा प्रमाणात बागायत पिके घेण्यास शेतकऱयांना प्रोत्साहन द्यावे. दरवर्षी बागायत पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली पाहिजे. शेतकऱयांनी मिश्र पिकांचे उत्पादन घेतल्यास मोठा आर्थिक फायदा मिळतो. अधिकाऱयांनी ठिबक सिंचनासाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची माहिती द्यावी. यासाठी अधिक अनुदान दिले जाईल. यापूर्वी ठिबक सिंचनाचा लाभ घेतलेल्या शेतकऱयांना अनुदान दिले आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबीयांना द्यावे लागणाऱया रकमेपैकी 10 टक्के रक्कम सरकार देण्याबाबत आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. जलजीवन योजनेंतर्गत घराघरापर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याबाबत त्वरित पावले उचलावीत. याचबरोबर शिमोगा जिल्हय़ातील प्रत्येक खेडय़ांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना केली.
यावेळी खासदार डी. वाय. राघवेंद्र, एमएडीबी अध्यक्ष गुरुमूर्ती, ता. पं. अध्यक्ष सुरेश नायक, जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार, जि. पं. सीईओ वैशाली, जिल्हा पोलीसप्रमुख शांतराजू उपस्थित होते.









