आगामी आयपीएल मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर प्रँचायझींचा प्राधान्यक्रम अंतिम टप्प्यात,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ यंदाच्या आयपीएल लिलावात विंडीजचा माजी कर्णधार व जागतिक स्तरावरील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या जेसॉन होल्डरला करारबद्ध करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावेल, असे स्पष्ट संकेत आहेत. आरसीबीप्रमाणेच अन्य प्रँचायझींनी देखील होल्डरवर फोकस ठेवला तर तो यंदाच्या मेगा ऑक्शनमधील सर्वाधिक महागडा खेळाडू देखील ठरु शकतो.
आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व मोहम्मद सिराज या खेळाडूंना रिटेन केले असून होल्डरवर 12 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्याची त्यांची रणनीती असल्याची सूत्रांनी माहिती दिली.
‘बेन स्टोक्स उपलब्ध नाही. हार्दिक पंडय़ा व मार्कस स्टोईनिस यापूर्वीच करारबद्ध केले गेले आहेत. मिशेल मार्श सातत्याने दुखापतग्रस्त असल्याने पूर्ण आयपीएल खेळू शकणार का, याबद्दल साशंकता आहे. त्या पार्श्वभूमीवर जेसॉन होल्डरसारखा दिग्गज खेळाडू प्रभावी योगदान देऊ शकतो, याची जवळपास सर्व संघांना खात्री आहे, असे एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
आगामी लिलावासाठी आरसीबीच्या ‘पर्स’मध्ये 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे आणि ते होल्डरसह चेन्नईचा माजी फलंदाज अम्बाती रायुडू व राजस्थान रॉयल्सचा माजी युवा खेळाडू रियान परागला करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येऊ शकतात.
‘होल्डरसाठी आरसीबीने 12 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. याशिवाय, रायुडूसाठी 8 कोटी रुपये तर रियान परागसाठी 7 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्याची त्यांची रणनीती आहे. जर या तीन खेळाडूंवर त्यांनी 27 कोटी रुपये खर्च केले तर त्यांच्याकडे आणखी 30 कोटी रुपये उपलब्ध असतील. कोहली, मॅक्सवेल, सिराज, होल्डर, रायुडू, पराग अशी लाईनअप सेट होऊ शकली तर आरसीबीचे ते बलस्थान ठरेल’, असे सूत्राने पुढे नमूद केले.
आता लिलावातील अनिश्चिततेचा अंदाज देणे शक्य नसले तरी विशेषतः होल्डरवर या संघाचा भर असेल, हे स्पष्ट आहे. ख्रिस मॉरिस उत्तम क्रिकेटपटू आहे. मात्र, त्याच्यासाठी 16 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मोजणे व्यवहार्य आहे का, याचा विचार आता सर्वच प्रॅँचायझी अनुभवावरुन करु लागले आहेत. 2015 मध्ये युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने 15 कोटी रुपये मोजले, त्यावेळी ती बोली ब्रँड प्लस मार्केट अशा दोन्ही बाबींवर आधारित होती, याचाही येथ संदर्भ देण्यात आला.
चेन्नईने जे यश मिळवले, त्यात रायुडूचे योगदान महत्त्वाचे होते आणि धोनी पुन्हा एकदा रायुडूसाठी आग्रही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चित्र आहे. रायुडू यंदा यष्टीरक्षक-फलंदाज अशा दुहेरी जबाबदारीत दिसून येऊ शकतो. रियान परागला 2020 मधील उत्तम हंगामानंतर मागील हंगामात अपयशाचा सामना करावा लागला. पण, त्याची मोठे फटके मारण्याची क्षमता आणि उत्तम ऑफ ब्रेक गोलंदाजी उपयुक्त ठरु शकते, हे पाहता त्याच्यासाठीही उत्सुकता असू शकेल.
आरसीबी कर्णधाराच्या शोधात
विराट कोहलीने मागील हंगामात नेतृत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आरसीबीला आता नव्या कर्णधाराचा शोध असेल. यासाठी ते श्रेयस अय्यरला करारबद्ध करु शकतात किंवा विराटलाच किमान आणखी एक हंगाम नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी राजी करु शकतात.
आगरकर म्हणतो, विराटकडेच हवे आरसीबीचे नेतृत्व!
2022 आयपीएल हंगामासाठी विराट कोहलीने आरसीबीचे नेतृत्व पुन्हा सांभाळण्याची तयारी दाखवली तर या प्रँचायझीसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल, असे मत माजी मध्यमगती गोलंदाज अजित आगकरकरने व्यक्त केले. कोहलीने मागील हंगामानंतर कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आरसीबीने त्याला संघात रिटेन केले. या पार्श्वभूमीवर आगरकर बोलत होता.
‘विराटने स्वतः तयारी दर्शवत नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा राजीखुशीने स्वीकारली, पूर्वीच्या ऊर्जेने ही जबाबदारी सांभाळण्याची तयारी दर्शवली तर आरसीबीसाठी ही खूप महत्त्वाची बाब असेल. आरसीबीने 12 ते 14 क्रमांकांच्या राखीव खेळाडूंसाठी कधीही अधिक पैसे मोजलेले नाहीत, असे सातत्याने दिसून आले आहे. फलंदाजीच्या आघाडीवर ते पहिल्या तीन खेळाडूंवरच अधिक लक्ष केंद्रित करुन असतात. पण, या तीन खेळाडूंसाठी अधिक पैसे मोजले तर मध्यफळीत उत्तम खेळाडू करारबद्ध करताना बऱयाच मर्यादा येतात आणि त्याचा संघाला फटका बसतो’, असे आगरकरने येथे नमूद केले.









