सलग सातव्या दिवशी तेजीची नोंद : सेन्सेक्स 40,509.49 वर
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱया पतधोरणासंदर्भातील रिझर्व्ह बँकेची बैठक शुक्रवारी अखेर पार पडली. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपोदर आणि रिव्हर्स रेपोदर जैसे थे राहणार असल्याचे सांगत देशातील जीडीपीत सुधारणा होण्याची माहितीही दिली. या सर्वाचा सकारात्मक परिणाम म्हणून शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 326.82 अंकांनी वधारुन 40,509.49 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 79.60 अंकांच्या तेजीसोबत 11,914.20 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शेअर बाजाराचा मूड चांगला होता. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून होते.
प्रमुख कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, ओएनजीसी आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
बीएसईमधील बँकिंग आणि वित्तीय समूहातील निर्देशांक 2.64 टक्क्मयांनी वधारलेत तर रियल्टी आणि वाहन क्षेत्रातील निर्देशांक खाली आले आहेत. जगभरातील शेअर बाजारात प्रामुख्याने शांघायचा बाजाराचा कल सकारात्मक राहिला होता. तर हाँगकाँग आणि टोकीओतील बाजार नुकसानीत राहिले आहेत.
युरोपातील शेअर बाजाराचा कल हा सकारात्मक राहिला होता. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रेंट कच्चे तेल 0.85 टक्क्मयांच्या वाढीसोबत 42.97 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. तसेच विदेशी चलन विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी वाढून 73.15 वर बंद झाला आहे.








