महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष : नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराचे सुशोभिकरण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. यापूर्वी आरपीडी कॉर्नर ते गोगटे कॉलेजपर्यंत रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह दिवे बसविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनंतर दिवे मोडकळीस आले असून याकडे महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे खर्ची घातलेला निधी वाया गेला आहे.
शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून कोटय़वधी निधी मंजूर करण्यात आला आहे. पण निधीचा विनियोग व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सुशोभिकरणाच्या नावावर निधीचा दुरुपयोग होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. शहराचे सुशोभिकरण करण्याकरिता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधी निधी खर्ची घातला जात आहे. पण निधी खर्ची घालून करण्यात आलेल्या कामाचा उपयोग नागरिकांना होत नसून फक्त कंत्राटदाराचा फायदा होत आहे.
एकीकडे काही भागात पथदीप नाहीत. पथदीप बसविण्याची मागणी वारंवार करूनही दखल घेतली जात नाही. मात्र, पथदीप असलेल्या ठिकाणी फूटपाथवर दिवे बसविण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी आरपीडी कॉर्नर ते गोगटे कॉलेजपर्यंतच्या फूटपाथवर डेकोरेटिव्ह दिवे बसविण्यात आले होते. पण हे दिवे फक्त काही महिन्यांपुरतेच सुरू होते. त्यानंतर कधीच सुरू करण्यात आले नाहीत. दिव्यांची दुरवस्था झाली असून कंत्राटदाराने कधीही देखभाल केली नाही. यामुळे सर्व दिवे मोडकळीस आले आहेत.
स्मार्ट रोडवरील डेकोरेटिव्ह दिवे बदलण्याची गरज
येथील दिव्यांकरिता घालण्यात आलेली विद्युत पुरवठय़ाची वीजवाहिनी खराब झाली असल्याने दिवे बंद असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले, पण डेकोरेटिव्ह दिवे सुरू करण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे याबाबत स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. स्मार्ट रोडवरील डेकोरेटिव्ह दिवे बदलण्याची गरज आहे. याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









