कॅश काऊंटर बंद, नागरिक खोळंबले
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सर्व शासकीय कार्यालये कोविड काळात सुरू असताना आरटीओ कार्यालयात काम ठप्प होते. आता कुठे सुरू झाले तर कॅश काऊंटरच बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे.
आरटीओ कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी करणे, वाहनचालक परवाना काढणे, परवाना नूतनीकरण अशी कामे रोजच्या रोज सुरू असतात. कार्यालयात वाहनचालक आणि मालकांची रेलचेल सुरू असते. परंतु कोविडचे कारण पुढे करून आरटीओ अधिकाऱयांच्या उदासीनतेमुळे आरटीओ कार्यालयाचे काम गेले चार-पाच महिने ठप्प आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाशी संबंधित नागरिकांची सगळीच कामे खोळंबली आहेत.
पैसे भरणाऱयांचा खोळंबा
चार-पाच महिन्यांतर आता कुठे गेल्या आठवडय़ात आरटीओमधील काम सुरू झाली. वास्तविक इतर सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू असताना आरटीओ कार्यालयाचे काम ठप्प होते. आता सुरू झाल्यावरही कॅश काऊंटर बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता अनेक वाहनचालक कॅश काऊंटरवर वाहन परवाना, वाहन नोंदणीसंदर्भात पैसे भरण्यासाठी गेले तर तिथे कुणीच नव्हते. दुपारपर्यंत वाट पाहिली तरी कोणी नव्हते. त्यामुळे लांबून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे.
गौडबंगाल काय?
कॅश काऊंटर सांभाळणारा कर्मचारी गैरहजर असेल तर आरटीओ अधिकाऱयांनी पर्यायी कर्मचारी देणे आवश्यक होते. परंतु तसे काही न केल्याने आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार पुढे आला असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरटीओ कार्यालयांतर्गत वाहन कर घोटाळय़ात अडकलेल्या वाहनाचाही प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे त्यातही कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. एवढे होऊनही आरटीओ अधिकारी शांतच आहेत. त्यामागे नक्की गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.









