चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा ः चीनच्या वेई यिविरुद्ध सहज विजय
चेन्नई / वृत्तसंस्था
युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चीनच्या वेई यिचा 2.5 विरुद्ध 1.5 गुणांनी पराभव करत मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर चेसेबल मास्टर्स 2022 ऑनलाईन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 16 वर्षीय प्रज्ञानंदसमोर उपांत्य फेरीत आता नेदरलँड्सच्या अनिश गिरीचे आव्हान असेल. अन्य एका उपांत्य लढतीत जागतिक स्तरावरील अव्वलमानांकित मॅग्नस कार्लसनसमोर चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असणार आहे.
मंगळवारी रंगलेल्या अन्य उपांत्यपूर्व लढतीत गिरी व कार्लसन यांनी आर्यन टोरी (नॉर्वे) व डेव्हिड ऍन्टॉन गुज्जारो (स्पेन) यांच्याविरुद्ध 2.5-0.5 अशा फरकाने सहज विजय संपादन केले. याचवेळी लिरेनने अझरबैजानच्या शॅखरियार मेमेद्यारोव्हला 2.5-1.5 फरकाने नमवले.
त्यापूर्वी, सोमवारी उशिरा खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीत टिनेजर भारतीय स्टार बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने काळय़ा मोहऱयांसह खेळताना 90 चालीत विजय संपादन केला. त्याने चार गेम्सच्या लढतीत पहिले सलग दोन गेम जिंकत उत्तम आघाडी घेतली. त्यानंतर चायनीज प्रतिस्पर्धी वेईने तिसरा गेम जिंकत तफावत कमी केली. पुढे चौथ्या गेममध्ये बरोबरी मिळवणे देखील प्रज्ञानंदसाठी पुरेसे होते. चौथ्या गेममधील बरोबरीसह त्याने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
प्रज्ञानंदने या स्पर्धेतील सहाव्या फेरीत कार्लसनला हरवित खळबळ उडवून दिली असून अनिश, कार्लसन व डिंग लिरेन यांच्यानंतर तो चौथ्या स्थानी राहिला. पी. हरिकृष्णा व विदित गुजराती या अन्य दोन भारतीय खेळाडूंना बाद फेरी गाठता आली नाही.








