हिंडलगा/वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा शनिवारी सायंकाळी बेनकनहळ्ळी, कोनेवाडी व सुळगा (हिं.) गावांमध्ये झंझावाती प्रचार करण्यात आला. तिन्ही गावांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषा, संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांतून केला जात आहे.
सकाळी कंग्राळी खुर्द, ज्योतीनगर व रामनगर परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. तर सायंकाळी पश्चिम भागातील बेनकनहळ्ळी, कोनेवाडी व सुळगा (हिं.) गावांमध्ये भव्य प्रचारफेरी काढून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना स्थानिक लोकप्रतिनिधी व समितीप्रेमी नागरिकांनी केले. त्याला मतदारांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आपल्या हक्काची समिती व मराठी भाषिक उमेदवार चौगुले यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याची ग्वाही नागरिकांतून दिली जात आहे.
प्रारंभी बेनकनहळ्ळी येथील छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील लोकप्रतिनिधी, महिला व युवकांच्या उपस्थितीत प्रत्येक गल्लीमध्ये भव्य अशी पदयात्रा काढून मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन समितीलाच मतदान करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी सुवासिनींनी ठिकठिकाणी औक्षण करून चौगुले यांचे स्वागत केले. तर युवा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे, ‘जय भवानी, जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून सीमाभागात पुन्हा एकदा मराठीचा गजर घुमू लागल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. तर यावेळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत म. ए. समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहून मतदानातून सरकारला लोकेच्छा दाखवून देण्याचे आवाहन स्वत: मतदारांतून केले जात आहे.
प्रचारफेरीत माजी आमदार मनोहर किणेकर, अॅड. सुधीर चव्हाण, बाबाजी देसूरकर, आनंद पाटील, प्रभाकर देसूरकर, युवराज पाटील, उमेश पाटील, पांडुरंग देसूरकर, योगेश पाटील, राजू देसूरकर, मारुती पाटील, रोहित पाटील, एम. एल. पाटील यांच्यासह समिती पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्या, सुळगा (हिं.), कोनेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-









