चिराग-पशुपती यांच्यातील वादाचा परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) पक्षचिन्ह गोठवले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस हे दोघेही ते वापरू शकणार नाहीत. दोघांना पक्षचिन्ह देण्याबाबत अंतिम निर्णय 4 ऑक्टोबर रोजी घेतला जाणार आहे. दोन्ही गटांना 4 ऑक्टोबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे. प्रतिस्पर्धी गटांमधील वाद मिटत नाही तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षाचे नाव किंवा त्याचे निवडणूक चिन्ह ‘बंगला’ वापरण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
बिहारमधील दोन विधानसभा जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असल्याने निवडणूक आयोगाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनापासून पशुपती कुमार पारस आणि चिराग पासवान यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. पक्षात दोन गट तयार झाले असून दोघेही पक्षावर आपापले दावे करत आहेत.









