केनियाच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची प्राचीन वैद्यकीय पद्धती आयुर्वेदाची ख्याती जगभरात आहे. ती आणखी वाढवणारी आनंददायक घटना घडली आहे. आयुर्वेदिक औषधामुळे आफ्रिका खंडातील एक देश असणाऱया केनियाचे माजी पंतपंतप्रधान रैला ओडिंग यांच्या कन्येची गेलेली दृष्टी परत आली आहे. यामुळे ओडिंग यांनी भारताचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओडिंग यांची भेट घेऊन त्यांच्या कन्येच्या प्रकृतीची चौकशी करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
ओडिंग यांच्या कन्येची दृष्टी काही कारणांमुळे पूर्णतः गेली होती. त्यामुळे ती अंध झाली होती. अनेक उपचार केल्यानंतरही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून तिला केरळच्या सरकारी आयुर्वेदिक वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तिच्यावर आयुर्वेदिक औषधांचे उपचार करण्यात आले. 3 आठवडे उपचार करण्यात आल्यानंतर जणू चमत्कार घडला. तिची गेलेली दृष्टी परत आली. तिच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे.
ओडिंग यांच्याकडून प्रशंसा
कन्येची दृष्टी परत आल्याने आनंदलेल्या ओडिंग यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीची तोंड भरुन प्रशंसा केली आहे. भारताच्या या प्राचीन पद्धतीमुळे आपल्या कन्येला जणू पुनर्जन्मच मिळाला असून आमच्या पूर्ण कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही आशा सोडली होती. पण आयुर्वेदाने आमच्या जीवात जीव आला. यासाठी आम्ही भारताचे ऋणी आहोत, असा संदेश त्यांनी पाठविला आहे.
आयुर्वेदाची महती आणखी वाढणार
या घटनेमुळे आयुर्वेदाची महती आणखी वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे. आयुर्वेदासंबंधी आजही अनेकजण अविश्वास व्यक्त करतात. त्यांनाही या घटनेमुळे आयुर्वेदाचे महत्व पटेल. ही औषध पद्धती सहस्रावधी वर्षांचे प्रयोग आणि अनुभव यांच्या आधारावर निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर औषध पद्धतींसाठी असाध्य असणारे रोग आयुर्वेद बरे करु शकतो, असे अनेकदा दिसून आले आहे. ही घटना त्यातीलच एक आहे, असेही प्रतिपादन तज्ञांनी केले.
पंतप्रधान मोदींशी संवाद
केनियाचे माजी पंतप्रधान ओडिंग सध्या भारताच्या दौऱयावर असून त्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या कन्येची दृष्टी परत असल्याची शुभवार्ता त्यांनीच सांगितली. पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंध आणखी दृढ करण्याचा निर्धार या भेटीत करण्यात आला. तसेच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला.









