नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेदरम्यान उत्तेजक सेवनावर नियंत्रण राखण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाणार असून त्याअंतर्गत खर्चात कपात करण्यासाठी नाडा संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संघटनेची मदत घेणार आहे. चाचणीसाठी खेळाडूंचे नमुने घेतल्यानंतर ती केंद्राकडे पाठवणे, तेथून अहवाल मागवणे यात खर्च वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर नाडा विविध पर्याय आजमावून पाहत आहे.
युएईच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडो) तसेच स्वीडनच्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी व व्यवस्थापन संस्थेशी संपर्क साधणे हा आणखी एक पर्याय होऊ शकतो. मागील 12 वर्षांपासून आयपीएल हंगामात हीच संस्था नमुने घेऊन चाचणी करत आली आहे. 2019 मधील तिसऱया सत्रात बीसीसीआय नाडाच्या अधिपत्याखाली आले. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच नाडाकडून नमुने व चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होईल. कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये हलवण्यात आली असून तूर्तास, त्यांना गृह खात्याकडून संमतीची प्रतीक्षा आहे.
‘संमती प्राप्त रुपरेषा पुढील आठवडय़ात निश्चित होईल आणि त्यानंतर नाडा त्यांच्या प्रक्रियेबाबत निर्णय घेईल. नमुने घेणे, चाचणी करणे, प्रवास हा पूर्ण खर्च नाडाला करायचा आहे. त्यामुळे, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असेल’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
युएईतील संस्था नाडो उत्तेजक चाचणीसाठी नमुने घेईल आणि ते दोहा येथील वाडाशी संलग्न प्रयोगशाळेकडे पाठवेल, हा आणखी एक सोपा पर्याय यावेळी असेल. वाडाने राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर (एनडीटीएल) निलंबन लादण्यापूर्वी नाडा याच संस्थेकडे चाचणीसाठी नमुने पाठवत आले आहे.









