दुबई / वृत्तसंस्था
आयपीएलच्या उत्तरार्धात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने व्हीपीएस हेल्थकेयर या मेडिकल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सहकार्याने सुमारे 30 हजार आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे. आयपीएल खेळाडू, सपोर्ट स्टाफ व अन्य संबंधित घटकांची यावेळी चाचणी होईल. आयपीएलच्या उत्तरार्धातील 31 सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवले जाणार आहेत.
दुबईस्थित व्हीपीएस हेल्थकेयर कंपनीकडेच खेळाडूंवर तातडीने उपचार, स्पोर्ट्स मेडिसिन एक्स्पर्ट्स व एअर ऍम्ब्युलन्स सपोर्टची देखील जबाबदारी असणार आहे. आयपीएल उत्तरार्धात प्रत्येक तिसऱया दिवशी बायो-बबलमधील सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाणार आहे. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात प्रत्येक पाच दिवसांनी सर्व सदस्यांची चाचणी घेतली गेली होती.
आयपीएलसाठी खेळाडू संयुक्त अरब अमिरातीत येण्यापूर्वीच व्हीपीएस हेल्थकेयर कंपनीने दुबई व अबु धाबीतील 14 हॉटेल्समधील 750 हॉटेल स्टाफची चाचणी पूर्ण केली. त्यानंतर दि. 13 ऑगस्ट रोजी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स संघातील खेळाडूंची चाचणी घेतली गेली. नव्या प्रोटोकॉलनुसार, संघातील सर्व खेळाडू, पदाधिकाऱयांची प्रत्येक 3 दिवसांनी चाचणी होणार आहे.









