आयकर विभागाकडून तगादा : व्यापाऱयांकडून मुदतवाढीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आयकर रिटर्न फायलींग करताना करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टलवर एक फाईल अपलोड करताना 40 ते 60 मिनिटांचा कालावधी लागत असल्याने ही प्रक्रिया अत्यंत किचकट झाली आहे. एकीकडे कर भरणे अवघड झाले असताना दुसरीकडे मात्र आयकर विभाग कर वेळेत भरावा यासाठी तगादा लावत आहे. दि. 31 डिसेंबरपूर्वी कर भरावा अन्यथा दंड भरावा लागेल, असे मेसेज करदात्यांना पाठविले जात आहेत. पोर्टलवर फाईल जमा करणे वेळकाढू होत असल्याने व्यापाऱयांमधून वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.
मागीलवषी घाईगडबडीने इन्फोसिस कंपनीकडून नवीन पोर्टल तयार करून घेण्यात आले. पूर्वतयारी न करताच पोर्टल सुरू केल्याने सुरुवातीपासूनच करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे देशभरातून या पोर्टलला व्यापाऱयांनी तीव्र विरोध केला. 31 डिसेंबरपूर्वी वैयक्तिक कर तर 15 जानेवारीपूर्वी फर्म अथवा उद्योगांचे आयकर (ऑडिट रिपोर्ट) भरावयाचे आहेत. त्यानंतर कर भरणाऱयांना दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कर भरण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू आहे.
…या येताहेत समस्या
पोर्टलवर कर भरताना अनेक अडचणी येत आहेत. तांत्रिक त्रुटीमुळे पोर्टल बंद पडणे, लॉगईन करण्यामध्ये अडचणी, फाईल जमा करूनही पुन्हा नव्याने सुरुवात, भरलेला फॉर्म न दिसणे, पोर्टल हँग होणे अशा अनेक समस्या करदात्यांना येत आहेत. याबद्दल काही करदात्यांनी आयकर विभागाशी संपर्क केला असता, प्रयत्न करत रहा असा सल्ला देण्यात आला. परंतु आता दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न करदात्यांना पडला आहे.
डिजिटलपेक्षा पोस्टाद्वारे फाईल पाठविणे सोयीचे
कर भरणे प्रक्रिया सुलभ क्हावी यादृष्टीने डिजिटल माध्यम निवडण्यात आले. सरल ई-फायलींगच्या माध्यमातून करदात्यांना आपल्या आयकराची फाईल आयकर विभागाकडे जमा करता येत होती. परंतु ही प्रक्रिया आता किचकट होत असून कर भरणे डोकेदुखीचे ठरत आहे. नोकरदारांसह व्यापारी, उद्योजक, सीए, अकाऊंटंट यांच्यासाठी ही प्रक्रिया वेळकाढू ठरत आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ 60 टक्केच करदात्यांनी आपली फाईल जमा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक फाईल जमा करण्यासाठी जर तासाभराचा कालावधी लागत असेल तर यापेक्षा पूर्वीप्रमाणे पोस्टाद्वारे फाईल पाठविणे सायीचे ठरेल, अशा प्रतिक्रिया व्यापारी देत आहेत.
आयकराच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी- सतीश तेंडोलकर
आयकराच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे कर भरणे अडचणीचे झाले आहे. एक फाईल जमा करण्यासाठी तासाचा कालावधी लागत असल्याने करदात्याचा अर्धा वेळ त्यामध्येच जात आहे. दुपारनंतर तर पोर्टल सुरूच होत नाही. अशा अनेक अडचणी येत असल्यामुळे कर भरण्यासाठी तसेच ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी सतीश तेंडोलकर यांनी केली.









