वर्षभरातच रस्त्याच्या बाजूला असलेले पेव्हर्स खचले : कामाच्या दर्जाबद्दल तीव्र नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
आदर्शनगर ते येळ्ळूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. फुटपाथ तसेच इतर कामे रेंगाळली आहेत. बांधण्यात आलेले फुटपाथ केवळ वर्षभरातच खचले आहे. यामुळे कामाचा दर्जा उघडा पडला आहे. स्मार्ट सिटीमध्ये सुरू असलेल्या दर्जाहिन कामांमुळे परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. घाईगडबडीत फुटपाथवर पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. ते पेव्हर्स केवळ वर्षभरातच खराब झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी केबल उघडय़ावरच आहेत. आयएमईआरच्या समोर पाईप फुटून अनेक महिने पाणी रस्त्यावरून वाहत होते. नवीन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावरूनच हे पाणी वाहत होते. एकूणच या रस्त्याचे रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरण अत्यंत खराब असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.
जेल शाळा तसेच तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यालयासमोरील कामकाज अर्धवटच आहे. या ठिकाणी पथदीप नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड बनले आहे. एकूणच हिंदवाडी तसेच या परिसरातील रस्ते कुचकामी ठरू लागले आहेत. काही दिवसांतच रस्त्याच्या बाजूला असलेले पेव्हर्स खचले आहेत. त्यामुळे कामकाजाचा दर्जा आता चव्हाटय़ावर येऊ लागला आहे.
अनेक ठिकाणी केबल्स उघडय़ावरच ठेवल्या आहेत. त्यामुळे फुटपाथवरून ये-जा करणे अवघड बनले आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.









