भारताने रशियासोबत दाखवली ताकद : दोन्ही नौदलांमधील सामंजस्याचे दर्शन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर घालणारी स्वदेशी बनावटीची ‘गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर’ म्हणून ओळख असणाऱया आयएनएस कोची युद्धनौकेची रविवारी यशस्वी चाचणी पार पडली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात रशियन नौदलासोबत ‘आयएनएस कोची’ची चाचणी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. स्वदेशी बनावटीच्या आणि देशातच तयार केलेल्या क्षेपणास्त्रनाशकाची भारतीय नौदलाने चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या सरावाने भारत आणि रशिया या दोन्ही नौदलांनी सामंजस्याचे दर्शन घडवले. या सरावादरम्यान सामरिक युक्ती, क्रॉस-डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि सीमनशिप कारवायांचा यात समावेश असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले. या चाचण्यांसाठी नौदलाची तीन जहाजे केरळच्या कोची किनारपट्टीवर दोन दिवसांच्या सदिच्छा भेटीवर पोहोचली होती. या भेटीदरम्यान रशियन आणि भारतीय नौदल यांच्यात विविध व्यावसायिक चर्चा करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.
आयएनएस कोचीची वैशिष्टय़े
आयएनएस कोची या युद्धनौकेचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे यात 40 अधिकारी आणि 350 नौसैनिक आहेत. भारताने बनवलेले हे क्षेपणास्त्रनाशक 164 मीटर लांब आणि सुमारे 17 मीटर रुंद आहे. त्याची भारमान क्षमतादेखील 7,500 टन असून ती खूप चांगली मानली जाते. जहाजाची विद्युत ऊर्जा चार गॅस टर्बाइन जनरेटर आणि डिझेल अल्टरनेटरमधून मिळविली जाते. दोन्ही प्रणाली 4.5 मेगावॅट वीज निर्माण करण्यास सक्षम आहेत.









