वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
भारतात निर्मित आयएनएस कवरत्ती गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. भारतात निर्मित आयएनएस कवरत्ती अँटी-सबमरीन वॉरफेयर (एएसडब्ल्यू) आणि शत्रूच्या रडारच्या कक्षेत न येणाऱया स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहे. ही युद्धनौका दीर्घ पल्ल्याच्या मोहिमांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. या नौकेमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडली आहे.
भारताने गुरुवारी सुरक्षेच्या क्षेत्रात आणखी एक यश मिळविले आहे. रणगाडविरोधी दिशानिर्देशित क्षेपणास्त्र ‘नाग’ची अंतिम चाचणी गुरुवारी सकाळी राजस्थानच्या पोखरण येथे पार पडली आहे. वॉरहेडसह झालेली ही चाचणी यशस्वी ठरली आहे. हे स्वदेशी क्षेपणास्त्र आता सैन्यात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहे.
नाग क्षेपणास्त्र नाग मिसाइल कॅरियरने (एनएएमआयसीए) डागण्यात आले आहे. हे 4 ते 7 किलोमीटरच्या कक्षेपर्यंत लक्ष्य भेदू शकते. हे तिसऱया पिढीतील रणगाडा विरोधी दिशानिर्देशित क्षेपणास्त्र आहे. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही शत्रूच्या रणगाडय़ांना उद्ध्वस्त करण्यास नाग क्षेपणास्त्र सक्षम आहे. संरक्षण मंत्रालयाने 2018 मध्ये भारतीय सैन्यासाठी 300 नाग क्षेपणास्त्रs आणि 25 एनएएमआयसीए खरेदी करण्यास मंजुरी दिली होती.
आयएनएस कवरत्तीचे डिझाइन भारतीय नौदलाच्या नेवल डिझाइन डायरेक्टोरेटने तयार केले आहे. कोलकाता येथील गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने याची निर्मिती केली आहे. नौका निर्मितीसाठी 90 टक्क्यांपर्यंत भारतीय सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. या नौकेची संरचना तयार करण्यासाठी कार्बन कंपोझिटचा वापर झाला आहे. याच्या सर्व सागरी चाचण्या यापूर्वीच पूर्ण झाल्याने ही नौका त्वरित सेवा सुरू करणार आहे.









