पंचायतीच्या पवित्र्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामसभेत प्रश्नांची सरबत्ती : ही लाजिरवाणी बाब
प्रतिनिधी /सांगे
उगे पंचायतीच्या कक्षेत आयआयटी प्रकल्प होऊ घातलेला आहे. त्यासाठी भूसर्वेक्षण होते. त्या परिसरात 144 कलम लागू करून जमावबंदी आदेश लागू केला जातो. शेतकऱयांना शेतात जाण्यास अटकाव केला जातो. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मात्र पंचायत मंडळ आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणते. ही लाजिरवाणी बाब आहे. आपल्या पंचायत क्षेत्रात काय चालले आहे हे सरपंच आणि स्थानिक पंचायत सदस्याला खरोखरच माहिती नाही काय, असा सवाल रविवारी उगे पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला केला.
यावेळी व्यासपीठावर सरपंच भारती नाईक, उपसरपंच रामा पांढरमिसाळ, पंच मार्पुस पेरेरा, अल्विरा फर्नांडिस, दिव्या नाईक, विठ्ठल गावकर, उत्कर्षा देसाई, पंचायत सचिव सुषमा सावंत देसाई व गटविकास अधिकारी कार्यालयाचे गौरेश नाईक हजर होते. सध्या आयआयटीचा विषय गाजत असल्याने तसेच नियोजित आयआयटी उगे पंचायत क्षेत्रातील कोठार्ली गावात येणार असल्याने यावेळी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पंचायत सभागृहात झालेल्या या ग्रामसभेत प्रामुख्याने आयआयटी आणि रस्त्यावरील दिवाबत्ती हे विषय गाजले.
गोवा मुक्त होऊन 60 वर्षे पूर्ण झाली, पण काही ठिकाणी काळोखाचे साम्राज्य आहे आणि सरकार विकासाच्या बाता मारते. उगेच्या क्र. 2 वॉर्डातील पथदीपांसाठी फाइल दिली होती. परंतु 6 वर्षे झाली, तरी अजूनही पथदीपांची व्यवस्था होत नाही. असे का, असा प्रश्न टीना कुतिन्हो यांनी विचारला. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. वीजमंत्र्यांनी सांगितले की, तुम्ही हे पंचायत निधीतून करा. परंतु पंचायतीकडून एवढा निधी देता येत नाही, असे त्याला उत्तर देताना सरपंचांनी स्पष्ट केले. यावर बरीच चर्चा झाली. गावात जाण्यासाठी जर वीज नसेल, तर आम्ही जन्मभर काळोखातच राहायचे काय, असा प्रश्न कुतिन्हो यांनी केला.
पंचायतीच्या पवित्र्याने ग्रामस्थ संतापले
आज सर्वत्र आयआयटीचा विषय गाजत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. पण पंचायतीला आयआयटीविषयी काहीच माहिती नाही. पंचायतीला त्याबाबत काहीच कागदोपत्री आलेले नाही. उगे पंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येत असून सर्वेक्षण होत असताना हा प्रकल्प उगे पंचायत क्षेत्रात येतो की मळकर्णे ग्रामपंचायत कक्षेत असा पवित्रा पंचायत मंडळाने घेतल्याने यावेळी ग्रामस्थ संतापले. आयआयटी प्रकल्प उगे पंचायतीच्या कक्षेत येत आहे. जेव्हा एखादा प्रकल्प येतो तेव्हा पंचायतीला विश्वासात घेतले पाहिजे. पण येथे पंचायतीला काहीच माहिती नाही. 144 कलम लावून लोकांना शेतामध्ये जाण्यास आणि एकत्र येण्यास सरकारने बंदी घातली आहे. जेव्हा जमिनीचे सर्वेक्षण चालू होते व शेतकरी विरोध करत होते तेव्हा स्थानिक पंच विठ्ठल गावकर यांनी नियोजित जागेवर जाऊन शेतकऱयांबरोबर उभे राहायला हवे होते. पण स्थानिक पंच आणि पंचायत मंडळाने आपले तोंड बंद ठेवले आहे, अशी टीका सांतान रॉड्रिग्स यांनी केली. यावेळी बरीच गरमागरम चर्चा होऊन लोकांनी पंचायत मंडळावर प्रश्नांची सरबत्ती केली. आयआयटीला विरोध वाढू लागल्याने सरपंच भारती नाईक यांनी पुन्हा या विषयावर ग्रामसभा घेऊया, असे सांगितले. यावेळी फिलीप फुर्तादो, माया जांगळी,डायगो मार्टीन, सॅबेस्तू फर्नांडिस आदीनी आपले विचार मांडले.









