प्रतिनिधी/ मडगाव
राज्य सरकारकडून सांगे येथे आयआयटी उभारण्यासाठीच्या प्रयत्नांना ठेच लागणार का, असा सवाल सध्या उपस्थित झाला असला तरी आयआयटी सांगेतच होईल. त्यात कोणतीच शंका नसल्याचा ठाम विश्वास स्थानिक आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय शिक्षण खात्याने राज्य सरकारकडून सीमांकीत केलेली जमीन या प्रकल्पासाठी विचारात घेतली नसल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, असे पत्र अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोहचलेले नाही तसेच प्रशासकीय पातळीवर कुणालाही कल्पना देण्यात आलेली नाही. हे पत्र जर कुणा व्हीव्हीआयपीला मिळाले असेल तर त्याची ही कल्पना आपल्याला नाही. काही झाले तरी आयआयटी सांगे मतदारसंघातच होईल याचा श्री. फळदेसाई यांनी पुनरूच्चार केला.
सांगे तालुक्यात कोटार्ली परिसरात आयआयटीसाठी सरकारने जमीन सीमांकीत केली होती. मात्र, ही जमीन अपुरी पडत असल्याने यापूर्वीच केंद्राने या जागेचा प्रस्ताव फेटाळला होता. जोपर्यंत अतिरिक्त जागा उपलब्ध करून देत नाही. तोपर्यंत या जागेचा विचार केला जाणार नसल्याचे कळविण्यात आले होते. आयआयटीसाठी 12 लाख चौरस मीटर जागा आवश्यक असून राज्य सरकारने त्यात तडजोड करून सात लाख चौरस मीटर जागा देण्याची तयारी दर्शविली होती. ही जागा सरकारच्या मालकीची होती.
जर अतिरिक्त जागा घ्यायची झाल्यास खासगी जागा घ्यावी लागणार आहे. केवळ सरकावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सात लाख चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली होती. अतिरिक्त खासगी घ्यायची झाल्यास तशी जागा आपल्याकडे चार ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
हल्लीच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे दक्षिण गोवा भेटीवर आले असता, त्यांनी देखील आयआयटी सांगेत होईल असे स्पष्ट संकेत दिले होते. आयआयटीसाठी जमीन अपुरी पडत असले तर आयआयटीचा प्रकल्प व्हर्टीकल पद्धतीने उभारला जाईल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.









