मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला पहिला पराभव स्वीकारावा लागला. काल कोलकातात खेळविण्यात आलेल्या सामन्यात चर्चिल ब्रदर्सने गोकुळम केरळने 3-0 गोलांनी पराभूत करून धक्कादायक विजयाची नोंद केली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला ममीत वानलालदुआत सांगा यांच्याकडून सॅल्फ गोल झाल्याने गोकुळम केरळने आघाडी घेतली.
दुसऱया सत्रात डॅनी अँटवीने 56 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल दुसरा तर 62 व्या मिनिटाला त्यानेच तिसरा गोल केला. बारा सामन्यांनंतर चर्चिल ब्रदर्सचा हा पहिलाच पराभव होता. त्यांचे आणि गोकुळम केरळचे प्रत्येकी 12 सामन्यांनंतर समान 25 गुण झाले आहेत, मात्र गोल सरासरीवर चर्चिल ब्रदर्स पहिल्या तर गोकुळम केरळ दुसऱया स्थानावर आहेत. त्यापूर्वी झालेल्या सामन्यात ट्रावने आकर्षक विजयाची नोंद करताना रियल काश्मीर संघाचा 3-1 गोलानी पराभव केला. या सामन्यात ट्राव संघासाठी बिद्यासागर सिंगने शानदार हॅट्ट्रिकची नोंद करताना 8 व्या, 37 व्या व 86 व्या मिनिटाला तीन गोल केले. पराभूत रियल काश्मीर संघाचा एकमेव गोल दानीश भटने नोंदविला. या विजयाने ट्राव संघाला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 12 सामन्यांतून 22 तर रियल काश्मीर संघाचे 12 सामन्यांतून 17 गुण झाले आहेत.









