लॉकडाऊन काळातही मनपाचे स्वच्छता कर्मचारी व्यवस्थितपणे पार पाडताहेत जबाबदारी
अनंत कंग्राळकर / बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र त्यासोबत परिसर आणि शहर स्वच्छ ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन काळात घरातील आणि शहरातील कचऱयाची उचल करण्याची जबाबदारी मनपाचे स्वच्छता कर्मचारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. संपूर्ण शहरवासीय घरात बंदिस्त असताना स्वच्छता कामगार मात्र आपले कर्तव्य बजावत आहेत.
कोरोनाबाबत खबरदारी घेण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सातत्याने हात स्वच्छ धुणे, एकत्र येऊ नये, सुरक्षित अंतर ठेवावे, अशा विविध सूचना केल्या जात आहेत. पण शहरातील आणि घरातील कचऱयाची उचल करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांचे काय? असा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेकडून घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. प्रत्येक स्वच्छता कामगाराला दारात जावे लागते. हे काम करीत असताना समोरची व्यक्ती कोरोनाग्रस्त नाही ना? असा प्रश्न नक्कीच स्वच्छता कामगारांच्या मनात निर्माण होतो. त्याचप्रमाणे घरातील कचऱयाची उचल करताना या विषाणूची लागण आपल्याला होणार नाही ना? असा प्रश्नदेखील निर्माण होतो. पण अशा मनातील भीतीकडे दुर्लक्ष करून महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपले कर्तव्य निर्भिडपणे बजावत आहेत.
शहरवासियांच्या आरोग्यासह स्वच्छता कामगारांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. प्रथम या विषाणूबाबतची माहिती स्वच्छता कर्मचाऱयांना देण्यात आली असून स्वच्छतेचे काम करताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा नागरिकांच्या घरावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे कचऱयाची उचल करताना आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. शहराची स्वच्छता करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो नाही तर शहरात कचऱयाचे ढिगारे साचून भलत्याच समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने आम्ही आमची सेवा बजावत आहोत, अशा प्रतिक्रिया स्वच्छता कर्मचाऱयांनी व्यक्त केल्या.
स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी
– स्वच्छता निरीक्षक अनिल बोरगावी

वडगाव, अनगोळ, भाग्यनगर, टिळकवाडी अशा विविध भागातील स्वच्छतेचे काम करीत आहोत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर नजर ठेवण्याचे कामदेखील मनपाच्या अधिकाऱयांवर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे केवळ स्वच्छता करून चालत नाही. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी सध्या अधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता दुकानांसमोर गर्दी होऊ नये, रोगप्रतिबंधक औषध फवारणी करणे, घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करणे ही सर्वच कामे लॉकडाऊन काळातही नियमितपणे सुरू असल्याची माहिती महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अनिल बोरगावी यांनी दिली.
स्वच्छता करताना आवश्यक खबरदारी घेण्यात येते
स्वच्छता निरीक्षक कलावती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. केवळ कचरा उचल करणे इतकेच काम नाही तर स्वच्छता कामगारांच्या आणि आमच्या आरोग्याची काळजीदेखील घ्यावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. किराणा, रेशन, फळ, औषध दुकानांसमोर गर्दी होऊ नये याकरिता नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. पण नागरिक ही दक्षता घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक ठिकाणी 3 फुटाच्या अंतरावर चुना घालून मार्किंग करण्यात येत असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक कलावती यांनी दिली. महिला अधिकारी असूनदेखील संचारबंदी काळात काम करण्याची प्रेरणा महापालिका आयुक्तांकडून मिळत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता कामगार आणि आम्ही दररोज स्वच्छतेचे काम करीत असल्याने कोणत्याच रोगराईची भीती वाटत नाही. पण कोरोना विषाणू खूपच धोकादायक असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात आली असल्याचे कलावती यांनी सांगितले.
स्वच्छता राखण्याबरोबर स्वत:ची काळजी घेण्याची अधिकाऱयांकडून सूचना
– स्वच्छता कामगार पेमा कांबळे

शहरातील स्वच्छता राखल्याखेरीज रोगराई कमी होणार नाही. स्वच्छतेचे काम आम्ही नियमितपणे करीत आहोत. संपूर्ण शहर लॉकडाऊन केल्याने सर्व नागरिक घरी बसून आहेत. पण त्यांच्या आरोग्यासाठी आम्हाला हे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता राखण्याबरोबर स्वत:ची काळजी घेण्याची सूचना अधिकाऱयांनी केली आहे. याकरिता हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर, आंघोळीसाठी डेटॉल साबण, मास्क, हॅण्डग्लोव्ज आदी साहित्य उपलब्ध करून दिल्याची माहिती स्वच्छता कामगार प्रेमा कांबळे यांनी दिली.
मनातील शंकांकडे दुर्लक्ष करून कर्तव्य पार पाडतो
– स्वच्छता कामगार प्रभावती अनघवाडी

स्वच्छता करणे हे आमचे काम आहे. सध्या पहाटे 5.30 वा. येऊन हे काम करीत आहोत. लोकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी आम्हाला स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही कचरा घेताना तुमची काळजी घ्या, अशी सूचनादेखील नागरिकांना करीत असतो, अशी माहिती स्वच्छता कामगार प्रभावती अनघवाडी यांनी दिली. संपूर्ण शहरवासीय घरात बंदिस्त आहेत. पण तुम्ही महिला असूनदेखील स्वच्छतेचे काम करण्यासाठी हजर आहात. तुम्हाला कोरोनाची आणि स्वत:च्या आरोग्याची धास्ती नाही का? अशी विचारणा केली असता, आम्ही कामावर येणार नाही असे कोणालाच सांगू शकत नाही. कारण आमचे हे कर्तव्य आहे. शहर आणि शहरवासियांचे घर स्वच्छ राहिल्यासच रोगराईचा प्रसार होणार नाही. त्यामुळे अधिकाऱयांच्या सूचनेनुसार आम्हाला हे काम करावे लागत आहे. बऱयाचदा मनात भीती निर्माण होते. कचरा घेताना मनात अनेक शंका निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचे काम करतो, असे उत्तर प्रभावती अनघवाडी यांनी दिले.
होम क्वारंटाईनबाबत अधिक दक्षता घ्यावी लागते
– कल्लाप्पा मेत्री

एरव्हीप्रमाणेच सकाळी स्वच्छतेचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्याशेजारी टाकण्यात येणारा कचरा आणि घरातील कचऱयाची उत्पत्ती कमी झाली आहे. तरीदेखील हे काम करणे बंधनकारक आहे. काही नागरिक परराज्य आणि परदेशातून आले आहेत. त्यांच्या घरांवर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून लाल पट्टी लावण्यात आली आहे. या घरातील कचरा घेण्यासाठी वेगळय़ा प्रकारच्या पिशव्या देण्यात येतात. त्या कचऱयाच्या पिशव्या वैद्यकीय कचऱयामध्ये जमा करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांनी केली आहे. त्यानुसार हा कचरा वेगळा जमा करण्यात येत असल्याचे स्वच्छता कामगार कल्लाप्पा मेत्री यांनी सांगितले.








