गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुला-मुलींची आर्त हाक : पैसे संपल्याने जीवनावश्यक वस्तूंचे हाल : खोली भाडे, दुकानदारांचे बिलही थकले
विशाल वाईरकर / कट्टा:
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी गोवा राज्यात गेलेले जिल्हय़ातील अनेक तरुण-तरुणी त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यातील काहींना जिल्हय़ातील काही मंडळींनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यावर त्यांनी काही दिवस घालविले. देशातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर संपेल व आपणास घरी जाता येईल, या आशेवर असताना लॉकडाऊनचा कालावधी एप्रिल अखेरपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे या तरुण- तरुणींचे आता हाल होत आहेत.
मालवण तालुक्यातील पेंडुर येथील 12, सावंतवाडी येथील 2, तर कणकवली येथील 3 असे 17 जण गोव्यात रोजगारासाठी गेले असता, अडकून पडले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी पेंडुरमधील दहाजणांना आता जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले आहे. याबाबत सुकन्या पेंडुरकर या युवतीच्या वडिलांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नंदू नातू यांना ही माहिती दिली. त्याची दखल घेत नातू यांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधत, गोवा येथे अडकलेल्या जिल्हय़ातील मुलांना आपण सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावेळी त्या मुलांशी संपर्क साधून त्यांची समस्या जाणून घेतली.
जिल्हय़ातील ही मुले गोवा येथे वेगवेगळ्य़ा कंपनीत काम करतात. त्यातील काही मुले गोव्यातील प्रसिद्ध टायटन येथे युनियन प्रिंटर्स या कंपनीत काम करतात. त्या कंपनीत वॉशिंग मशीनचे पार्ट बनविले जातात. ही कंपनी गोवा-वेर्णा येथे आहे. ही मुलेसुद्धा त्याच गावात कंपनीपासून सुमारे 12 किमी अंतरावर राहतात. ही मुले कॉन्ट्रक्ट बेसीसवर या कंपनीत नोकरी करतात. गेल्या महिन्याचा पगार त्यांना मिळाला. त्यातून त्यांनी जीवनावश्यक वस्तू आणून लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह केला. परंतु आता लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे नेमके करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचा साठा संपला असून त्यांचे हाल होत आहेत. काहींनी आपल्या कंपनीच्या कॉन्ट्रक्टरशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व बंद आहे. आपण काही करू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ठिकाणी मुले राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील खोल्यांची भाडी पैसे नसल्याने थकीत झाली आहेत. याबाबत खोली मालकही त्यांना विचारणा करीत आहेत. काही मुलांचे अन्नधान्याचे उधारीवर आणलेले बिलही थकले आहे. याबाबत माहिती मिळताच तरुण भारतने त्यांच्याशी संपर्क साधला असता, आमची इथून सुटका करा. आम्हाला एकदाचे काही करून आमच्या गावी न्या. आम्ही आमच्या जिल्हय़ात आल्यावर शासन जे नियम सांगेल, त्याचे काटेकोरपणे पालन करू. गावी आल्यावर शासनाने आम्हाला क्वारंटाईन केले तरी चालेल. पण काहीही करून आम्हाला आमच्या घरी परत न्या, अशा भावना या मुलांनी बोलताना व्यक्त केल्या.
लोकप्रतिनिधी, शासनाने प्रयत्न करावेत
गोव्यात अडकलेल्या जिल्हय़ातील मुलांना पुन्हा आपल्या घरी आणण्यासाठी गोवा राज्य शासनाशी जिल्हा प्रशासनाने चर्चा करून त्यांना जिल्हय़ात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर व जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित ग्रा.पं, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, असे मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे.
गोव्यात अडकलेल्या मुला-मुलींची नावे
मालवण तालुका-सुकन्या संतोष पेंडुरकर, ममता भास्कर पेंडुरकर, मयुरी भास्कर पेंडुरकर, तेजस्विनी भरत पेंडुरकर, विश्वाप्रिया विकास पेंडुरकर, सोनाली जानू पेंडुरकर, सोनम सत्यवान पेंडुरकर, स्मिता सत्यवान पेंडुरकर, राजेश कृष्णा पिंगुळकर, समीक्षा राजेश पिंगुळकर, सोनल सुभाष म्हापणकर, रसिका वामन म्हापणकर. कणकवली तालुका-राहुल शिंदे, लखन निपाणीकर, अमोल शिंदे सावंतवाडी तालुका-परशु मनोहर जाधव, प्रिया केशव जाधव.









