पत्रकार परिषदेत दिली माहिती
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील आमोणा न्हावेली येथे वेदांत कंपनीच्या विविध विस्तारित प्रकल्पांना आमोण पंचायत मंडळाने पूर्णपणे समर्थन दिले असून गावातील बेरोजगारी मिटविण्यासाठी कंपनीने पंचायतीला हमी दिली आहे. तसेच संपूर्ण गावात सध्या या कंपनीतर्फे आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सशक्तीकरण, कृषी व दुग्ध पालन, तरूणांसाठी कौशल्य विकास, पायाभूत सुविधा विकास, पाणी स्वच्छता या क्षेत्रात सिएसआर माध्यमातून विकास आणि सहकार्य सुरूच आहे. तर येणाऱया नवीन प्रकल्पांद्वारे गावातील पर्यावरणीय समतोल सांभाळताना प्रदुषण नियंत्रणात ठेवावे, अशी मागणी कंपनीकडे केलेली आहे, अशी माहिती आमोणाच्या सरपंचा सालिया सदानंद गावस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपसरपंचा सांघवी सागर फडते, पंचसदस्य काशिनाथ माथो, विजेश सावंत, कृष्णा गावस, शाबा गावस, संदेश नाईक आदींच उपस्थिती होती.
शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या बाबतीत कंपनीने गावातील लोकांना चांगली सेवा दिलेली आहे. मुलांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम करून शैक्षणिक प्रोत्साहन दिले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या आहेत. क्रिडाप्रेमींच्या कौशल्याला उभारी मिळावी यासाठी पंचायत फुटबॉल मैदानाचे नुतनीकरण केले आहे. आपल्या “बेक टु फार्मिंग” या उपक्रमाअंतर्गत वेदांत कंपनीने खत, बियणे, शेतीची उपकरणे प्रदान करून सहकार्य केले आहे. अशाचप्रकारे भविष्यात कंपनीतर्फे गावच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने गावाचा आणि गावातील लोकांच विचार व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे सरपंचा सालिया गावस यांनी सांगितले.
पर्यावरणीय प्रदुषण रोखण्यासाठी कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध पर्यावरणीय संरक्षणात्मक उपक्रमांमध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करीत आहे. कंपनीने त्यासाठी काही योजना राबविल्या असून स्थान केलेल्या अद्ययावत ग्रेफाईड उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध धुळ काढण्याच्या प्रणालींची पंचायत मंडळाला माहिती दिली आहे. त्याच प्रकारे आणखीनही उपाययोजना हाती घेताना लोकांना प्रदुषणाचा त्रास होऊ नये यासाठी कंपनीने पावले उचलावीत, अशी मागणी सरपंचा सालिया गावस यांनी केली आहे.
आता कंपनीकडून होणाऱया विस्तारित प्रकल्पामध्ये उत्पादन क्षमता वाढणार असल्याने गावातील बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याचे ईआयएच्या अहवालात म्हटले आहे. कंपनीने योग्य, सक्षम आणि पात्र स्थानिक तरूणांना व आजूबाजूच्या गरजू लोकांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध करून द्यावी आणि गावातील बेरोजगारीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करावे. या मुद्यावर कंपनीने दिलेल्या हमीवर पंचायत मंडळाने कंपनीच्या विस्तारित प्रकल्पांना समर्थक दिले आहे. असेही सरपंचा गावस यांनी म्हटले.









