ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बावीस आमदारांसह दिल्लीत ठाण मांडल्याने गेहलोत सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व आमदारांना असाल तिथून जयपूरला पोहचा, असा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन यांच्यात मागील काही दिवसांपासून वर्चस्ववाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असतानाच शनिवारी रात्री पायलट 22 आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
अडचणीत आलेल्या गेहलोत यांनी आज सकाळी कॅबिनेटची बैठक बोलावली. या बैठकीत . ज्या आमदारांचा फोन लागणार नाही, त्यांच्यापर्यंत पोहचा, सरकारला वाचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे, असे आदेश मंत्र्यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व आमदारांनाही असाल तिथून थेट जयपूरला हजर व्हा, असा आदेश दिला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भाजपचे विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया प्रयत्नशील असल्याचा आरोप गेहलोत यांनी शनिवारी केला होता.