म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरसाठी 11 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर : कार्यकर्त्यांनी रोहित पवारांचे मानले आभार
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व बारामती ऍग्रोचे सीईओ रोहित पवार यांच्याकडून बेळगावला 11 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आले. शिवसेना पक्षाच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही बेळगावकरांना मदतीचा हात पुढे केला आहे. मराठा मंदिर येथे म. ए. समितीने लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरला या मशीन देण्यात आल्या.
बेळगाव शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरिकांना गरजेच्या वेळी ऑक्सिजन मिळत नसल्याने जीव जात आहेत. याची माहिती बेळगावमधील कार्यकर्त्यांनी रोहित पवारांना दिली होती. याची दखल घेऊन बारामती ऍग्रोच्या माध्यमातून 11 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत.
समितीचे मदन बामणे यांनी आमदार रोहित पवारांचे आभार मानले. हे कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्यासाठी अविनाश खन्नूकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव, युवा समितीचे कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सचिव श्रीकांत कदम, सागर पाटील, माजी महापौर महेश नाईक, महादेव पाटील, बाळू जोशी, साईनाथ शिरोळकर, राजू कदम, शिवराज पाटील, इंद्रजीत धामणेकर, सुनील बोकडे, आकाश भेकणे, सूरज गवळी यांच्यासह इतर उपस्थित होते.
पवार कुटूंब व बेळगावचे नाते काय आहे?
बारामती ऍग्रोचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू तथा रोहित पवार यांचे आजोबा स्व. डॉ. आप्पासाहेब पवार हे बेळगावचे जावई. त्यामुळे तेव्हापासून बारामतीचे पवार कुटुंबीय व बेळगावचे ऋणानुबंध आहेत. शरद पवार यांनी सीमा आंदोलनात अग्रणी भूमिका घेतल्याने हे नाते अधिक घट्ट झाले. हाच वारसा तिसऱया पिढीनेही जपून ठेवला असून, त्यांच्याकडून आता बेळगावची सेवा केली जात आहे.









