गटनेते सुनील घाडीगावकर यांचा इशारा : शिरवंडे गावावर आमदारांकडून अन्याय!
किर्लोस तलाठी सजास अन्यायकारक पद्धतीने गाव जोडल्याचा आरोप
ग्रामस्थही संतप्त
प्रतिनिधी / मालवण:
शिरवंडे गावापासून नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसलेल्या किर्लोस गावातील तलाठी सजास शिरवंडे जोडून आमदार वैभव नाईक यांनी गावावर व सर्वसामान्य ग्रामस्थांवर अन्याय केला आहे, असा आरोप मालवण पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केला आहे. दरम्यान, शिरवंडे गावच्या सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल. आमदारांची मनमानी सहन केली जाणार नाही, असा संतप्त इशाराही घाडीगावकर यांनी ग्रामस्थांतर्फे दिला आहे.
मालवण तालुक्मयातील शिरवंडे, किर्लोस ही गावे असरोंडी तलाठी सजाला जोडलेली होती. मात्र, किर्लोस गावात मंजूर झालेल्या नव्या तलाठी सजास शिरवंडे गाव जोडण्यात आला. त्याठिकाणी जाण्यास नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. असरोंडी गावाला जी तलाठी होती, ती योग्य होती. जर बदल करायचा होता, तर दोन्ही गावांचा मध्य म्हणजे शिरवंडे गावात तलाठी कार्यालय होणे गरजेचे होते. आम्ही जागा उपलब्ध करून दिली असती, किंबहुना आजही देऊ. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आमदारांच्या या अन्यायकारक कारभाराबाबत शिरवंडे गावातील शिवसैनिकांनीही भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांनी ग्रामस्थांसोबत आंदोलनाच्या तयारीत सहभागी व्हावे, असेही घाडीगावकर यांनी सांगितले आहे.
आमदारांनी आमने-सामने यावे!
तलाठी सजा एका बाजूला गेल्याने शिरवंडे ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी भूमिका आमदार नाईक यांची असेल, तर त्यांनी आमने-सामने यावे, असे खुले आव्हान घाडीगावकर यांनी दिले आहे. दरम्यान, आमदार आमने-सामने आल्यास शिरवंडे ग्रामस्थच त्यांच्या कारभाराचा पंचनामा करतील, असा इशाराही घाडीगावकर यांनी दिला आहे.









