सध्या वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमे यांना ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा विषय नाही. जागतिक पातळीवरही तोच विषय आहे. यामध्येही इटली, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये ‘कोरोना’चा जो प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे, त्याबद्दलच बहुतेक वार्तापत्रे येत असतात. अधूनमधून आखाती आणि युरोपीय अन्य राष्ट्रांबद्दल थोडेफार सांगितले जाते. आफ्रिकेबद्दल तर काहीच बोलले जात नाही. तसे पाहता आफ्रिकेत कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्याही कमी आहे आणि त्या खंडात काही बडी राष्ट्रे अस्तित्वात नाहीत.
आफ्रिका खंडातील सर्वच राष्ट्रांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आहेत. मात्र सहा सात राष्ट्रे वगळता अन्यत्र त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. 16 एप्रिलपर्यंत एकूण रुग्णांची सर्वाधिक 2,506 एवढी संख्या दक्षिण आफ्रिकेत होती. दुसऱया क्रमांकावरच्या इजिप्तमध्ये फक्त एक रुग्ण कमी (2,505) होता. पण मृतांचा आकडा अल्जीरियामध्ये सर्वाधिक (336) होता. त्या पाठोपाठ इजिप्त (183), नायजर (143), मोरोक्को (127) अशी क्रमवारी त्या दिवसांपर्यंत होती. ते एक मागासलेले, उपेक्षित खंड असले तरी शंभरपेक्षा ‘कोरोना’ बळींची संख्या असणारा पाचवा देश त्यात सापडत नाही.
एकंदर 56 देश असणाऱया आफ्रिका खंडाची एकूण लोकसंख्या एकशे एकवीस कोटी एकसष्ट लाख आहे. म्हणजे भारतापेक्षा चौदा कोटीने कमी. क्षेत्रफळाचा विचार करता ते खंड भारताच्या सव्वानऊ पट मोठे आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण आफ्रिका खंडात 17,827 ‘कोरोना’ग्रस्त होते, त्यापैकी 913 मरण पावले, तर बरे झालेले रुग्ण 3,862 होते. त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण रुग्णसंख्या 9,152 होती आणि मृतांची संख्या 324 होती. यावरून आप्रेकेत ‘कोरोना’चा उपद्रव भारताच्या दुप्पट आहे असे म्हणता येईल, आणि मृत्यूचे प्रमाण तिप्पट आहे असे म्हणता येईल. बरे होणाऱयांचे मात्र जास्त आहे, हे चांगलेच!
असे असले तरी भारतातील एकूण पायाभूत संरचना आणि आरोग्य सुविधेचे जाळे, उच्चशिक्षित तज्ञांची संख्या, सर्वाधिक साक्षरता व शिक्षणप्रसार आणि आर्थिक सुबत्ता यांच्या तुलनेने आफ्रिका खंड कितीतरी मागे आहे. तेथील काही देशातील दरडोई उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक असले तरी आत्यंतिक दारिद्रय़ाने गांजलेले प्रदेशही बरेच आहेत. आकडय़ांच्या भाषेत सांगायचे तर संकलित माहितीनुसार आफ्रिकेतील 43 देशात दहा लाख लोकसंख्येमागे फक्त 5 इतक्या अल्प प्रमाणात अतिदक्षता विभागाची (आयसीयू) व्यवस्था आहे, तर 41 देशात सगळे मिळून 2 हजार सुद्धा चालू स्थितीतील व्हेंटिलेटर नाहीत. या गोष्टींचा विचार करता आफ्रिका ख्ंाडात ‘कोरोना’चा उपद्रव तुलनेने कमीच झाला म्हणायचे! अर्थात ज्ञात आकडेवारी पुरतेच!
गेल्या आठवडय़ात ही माहिती प्रसृत करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या आफ्रिकी प्रादेशिक संचालकांनी शहरी सुविधांच्या मानाने खूपच तुटपुंजी व्यवस्था व यंत्रणा असलेल्या आफ्रिकेतील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा मागोवा घेणे हे मोठे आव्हान आहे. आफ्रिकेत ‘कोरोना’च्या रुग्णांवर उपचार करण्याच्या व्यवस्थेची खूप कमतरता आहे हे त्यांनी अधोरेखित केले. जागतिक अन्न अभियान (वर्ल्ड फूड प्रोग्रॅम)च्या मदतीने 30 आफ्रिकन देशात शंभर रुग्णांवर उपचार करण्यास पुरतील एवढी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) म्हणजे पोषाख, हातमोजे इ. देण्यात येत आहेत आणि चीनकडून वाढीव 10 लाख मास्क पाठवण्यात येत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
‘कोरोना’ या रोगाचा फैलाव
आपल्या पाठोपाठ आर्थिक संकट घेऊन येतो असे आता समीकरणच बनले आहे. आफ्रिकेची त्यापासून सुटका नाही. उलट तुलनेने रोगप्रसाराचा
वेग पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा कमी असूनही त्या खंडातील सर्वच राष्ट्रांवर मोठे आर्थिक
अरिष्ट कोसळले आहे. आफ्रिका खंडाचे उत्तर आफ्रिका आणि उत्तर मध्य
व दक्षिण सहारा वाळंवटेतर राष्ट्रे असे दोन भाग कल्पिले जातात. उत्तर
आफ्रिकेतील इजिप्त आणि अल्जीरियात सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले. परंतु इजिप्त वगळता आफ्रिकेतील पैसा निर्माण
करणारी राष्ट्रे वाळवंटेतर प्रदेशात जास्त आहेत. 20.4 टक्के वाढीमुळे
प्रगतीच्या दिशेने निघालेल्या या महाकाय खंडाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या साथीमुळे कोलमडून
उणे 5.1 टक्के इतकी मागे रेटली जाईल, असा
अंदाज व्यक्त केला जात आहे. मनी कंट्रोल या संकेतस्थळाच्या अंदाजानुसार
2 कोटी लोक बेरोजगार होतील, तर संयुक्त राष्ट्र
संघटनेच्या मते ही संख्या 5 कोटीवर पोहोचेल.
दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया हे देश आफ्रिकेतील मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये गणले जातात. तेल आणि मौल्यवान धातूंची मागणी घटल्याने ते अडचणीत आले आहेत. आफ्रिकेतील दुसऱया क्रमांकाचा तेल उत्पादक देश अंगोला. तो आणि नायजेरिया तेलाच्या उत्पादन खर्चाची तोंडमिळवणी तरी होणार का या विवंचनेत आहेत. सगळ्या जगभर लॉकडाऊन असल्याने सोन्याची निर्यात थांबली. कापूस बाजार घसरला. चारही बाजूंनी भूवेष्टित माली या देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कापूस उत्पादनावर पोट भरते.
जगभरातील प्रवासी वाहतूक बंद आहे. आफ्रिकेच्या पर्यटनावर यामुळे कुऱहाड कोसळली. सेनेगल, सिएरा लिओन, केप वर्दे हे पर्यटन व्यवसायावर आधारित अर्थव्यवस्थेचे देश अडचणीत आले. दक्षिण अफ्रिकेतील जगप्रसिद्ध हॉलिडे मार्केटमधील दुकाने एरवी गर्दीने फुलून जातात. ती ओस पडल्यामुळे पंधरा लाख माणसे बेरोजगारीच्या छायेखाली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री श्रीमती हेंगिवे न्हाबाती यांनी या अरिष्टाची व्याप्ती अफाट असल्याचे सांगत शेती, मच्छीमारी, बँकिंग, विमा, वाहतूक, सांस्कृतिक क्षेत्र आणि मनोरंजन उद्योग यावर त्याचा खोल परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली आहे.
आफ्रिका खंडातील 95 टक्के विमान वाहतूक ठप्प झाली आहे. बुर्किना पॅसो या आधीच ‘बोको हरम’ मूलतत्त्ववाद्यांच्या दहशतवादामुळे त्रस्त झालेल्या देशातील मोठमोठी हॉटेल बंद पडू लागली आहेत. ग्राहकच नसल्याने 60-65 टक्के कर्मचारी वर्गाला त्यांनी नारळ देऊन घरी बसवले. बुर्किना पॅसोमध्ये बोकोहरम दहशतवाद्यांनी आधीच 18 लाख नागरिकांना देशातल्या देशात विस्थापित केले आहे. 70 लाख नागरिक अन्नपाण्याच्या अभावी तडफडत आहेत. त्यात हे विषाणू संकट!
वाळवंटेतर आफ्रिकी देशांमध्ये गेल्या 25 वर्षांत अशी आर्थिक परिस्थिती आली नव्हती असे निरीक्षण जागतिक बँकेने नोंदविल़े सर्व आफ्रिकी राष्ट्रांच्या संघटनेचे मुख्यालय असणारा इथिओपिया हा कॉफी उत्पादनातील अग्रेसर देश़ यातील वीस टक्के म्हणजे अडीच कोटी लोकसंख्या या उद्योगात काम करत़े युरोप-अमेरिका हे कॉफीचे मोठे गिऱहाईक़ पण त्यांच्याकडे हाहाकार उडाल्यामुळे कॉफी घेतो कोण? सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) पाच टक्के वाटा उचलणाऱया कॉफीचा अठरा लाख टन साठा पडून राहिला आह़े तपकिरी सोने (ब्राउन गोल्ड) म्हणून ओळखला जाणारा ‘कोको’ हा पदार्थ आयव्हरी कोस्टमध्ये मोठय़ा प्रमाणावर पिकविला जात़ो ‘कोट डी आयव्होर’ हे या देशाचे अधिकृत नाव़ जगातील 40 टक्के कोको या देशातील 60 लाख लोक निर्माण करतात़ हा सगळा व्यवहार थांबला आह़े
आफ्रिकन देश तसे गरीबच़ तेथील राष्ट्रांच्या तिजोऱया कधीच पूर्ण भरलेल्या नसतात़ तशात हे महासंकट़ संयुक्त राष्ट्र संघटना त्यांना सावरण्यासाठी काही पुढाकार घेईल तेवढाच़ एरवी स्वतःचे व्यापारी, तेल अथवा भूसामरिक हितसंबंध असल्याखेरीज प्रगत देश आफ्रिकेकडे पाहणार नाहीत़ नायजरचे अध्यक्ष महम्मदाउ इस्सोफाउ यांना दुसऱया महायुद्धानंतर युरोपीय देशांना मदतीचा हात देणारी ‘मार्शल प्लॅन’सारखी योजना जागतिक समुदायाने राबवली तर आफ्रिका हळूहळू सावरेल अशी आशा वाटत आह़े
राजेंद्रप्रसाद मसुरकर,
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)








