वृत्तसंस्था / लॉसेन
आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख अहमद अहमद यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फिफाने पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.
मादागास्कर येथे वास्तव्य करीत असलेले अहमद अहमद हे 2017 च्या मार्च पासून आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे (सीएएफ) अध्यक्ष होते. तसेच त्यांनी 2021 च्या अध्यक्षपदासाठी होणाऱया फेरनिवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. अहमद अहमद यांच्याकडून आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्याने फिफाच्या नियंत्रण समितीने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी नियमांचा भंग करताना अनेकाकडून मौल्यवान वस्तू भेट म्हणून स्वीकारल्याचे आढळून आले. तसेच फेडरेशनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या अध्यक्षपदाची त्यांनी अशा वर्तणुकीने थट्टा केली आहे. फिफातर्फे अहमद यांना 220,000 अमेरिकन डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. फिफाच्या परवानगीशिवाय त्यांनी हाज यात्रेसाठी जाणाऱया उमराह यात्रेकरूंना आर्थिक मदत दिली आहे. तसेच आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या क्रीडा साहित्य बनविणाऱया एका उद्योगसमुहाच्या करारामध्येही अहमद यांचा सहभाग असल्याचे फिफाच्या नियंत्रण समितीला आढळून आले आहे.
60 वर्षीय अहमद हे कोरोना बाधित झाल्याने गेल्या आठवडय़ात त्यांनी 20 दिवसांच्या कालावधीकरिता आपले अध्यक्षपद सोडले होते. फिफाकडून अहमद यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली असून या निर्णयाविरूद्ध ते क्रीडा लवादाकडे दाद मागू शकतात. 2019 च्या एप्रिलमध्ये आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे माजी अधिकारी फाहमी यांनी अहमद यांना अनेक आर्थिक भ्रष्टाचाराच्या गुन्हय़ाखाली दोषी ठरविले होते. अम्र फाहमी यांनी अहमद यांच्या या भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी फिफाला लेखी स्वरूपात माहिती दिली होती.