प्रतिनिधी / वास्को
वास्कोत अडकलेल्या परराज्यातील सुमारे 200 लोकांनी शनिवारी सकाळी वास्को रेल्वे स्थानक गाठले. परंतु निराशा झाल्याने त्यांना मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले. मात्र, तेथेही त्यांची निराशाच झाली. पोलिसांनी या जमावाला मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोपस्कर करण्याची सूचना केली. मात्र, मडगावला जाण्याचीही सोय त्यांच्या समोर नव्हती.
केंद्र सरकारने ज्या ज्या राज्यात परप्रांतीय लोक अडकलेले आहेत. किंवा अन्य लोकांना ज्यांना आपल्या मूळ राज्यात जायचे आहे अशा लोकांना परत पाठवण्याची सूचना राज्य सरकारना केली होती. दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केंद्राने केली होती. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी श्रमिक रेल्वे सेवाही सुरू करण्याचे नियोजन झाल्याने अशा लोकांमध्ये थोडेफार समाधान पसरलेले आहे. मात्र, काही लोकांमध्ये गैरसमजामुळे गोंधळही निर्माण झालेला असून आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध होईल म्हणून हे लोक रेल्वे स्थानकावर जमा होत आहेत. वास्को शहरात शनिवारी सकाळी असाच प्रकार घडला.
वास्को परीसरात अडकलेले व आपल्या राज्यात परत जाण्यासाठी उत्सुक असलेले सुमारे दोनशे लोक वास्को रेल्वे स्थानकावर जमा झाले. यात मजूर वर्गाचाच अधिक भरणा होता. रेल्वे स्थानकावर मोठय़ा प्रमाणात परप्रांतीयांची गावी परत जाण्यासाठी गर्दी जमल्याने तेथील रेल्वे सुरक्षा दल तसेच स्थानिक रेल्वे पोलीस यांच्यावर दडपण आले. त्यांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. गावी जायचे असल्यास सरकारी सोपस्कर करावे लागणार असल्याचे सांगून त्यांनी या जमावाला जवळच असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करण्याची सुचना केली. त्यामुळे हा जमाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. त्यामुळे तीथे असलेल्या पोलिसांना त्याना हाताळावे लागले. या ठिकाणी त्यांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती लिहून द्यावी लागेल अशी माहिती देण्यात आली. शिवाय ऑईनलाईन अर्ज करण्यासंबंधीची माहितीही या लोकांना देण्यात आली. मात्र, मडगाव गाठण्यासाठी सोय नसल्याने तसेच ऑनलाईनसंबंधीची सुचनाही पचनी न पडल्याने बराच वेळ हा जमाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच उभा होता. त्यामुळे शेवटी पोलिसांना त्यांना पांगवावे लागले.
मुरगाव तालुक्यातील पंचायतीमध्ये परप्रांतीयांची नोंदणी
दरम्यान, मुरगाव तालुक्यात परराज्यातील लोक मोठय़ा संख्येने अडकलेले असून परत गावी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. काम नाही, पैसा नाही आणि खाण्याजेवणाचीही अडचण अशी या लोकांची परिस्थिती झालेली असून आपल्याला एकदाचे आपल्या गावी परत जाते यावे यासाठी मुरगाव तालुक्यातून 1200 परप्रांतीय लोकांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. ज्याना आपल्या गावांमध्ये जाण्याची ईच्छा आहे अशा लोकांची पंचायतीमध्ये नावनोंदणी करून घ्यावी अशी सुचना प्रत्येक पंचायत कार्यालयाला पंचायत उपसंचालकांकडून करण्यात आलेली आहे. त्यानुसार ही नोंद करण्यात आलेली असून त्यासाठी स्थानिक पंच सदस्यांचीही मदत घेण्यात आलेली आहे. काल शनिवारीही या नावनोंदणीमध्ये भर पडलेली आहे. ही परप्रांतीयांची ही यादी पंचायत उपसंचालकांना व त्यानंतर ती जिल्हाधिकाऱयांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच या परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सोय करण्याबाबत विचारविनियम करण्यात येणार आहे. मुरगाव तालुक्यातील चिखली, बोगमाळो, सांकवाळ, कुठ्ठाळी, केळशी, कासावली, वेलसाव इत्यादी पंचायत क्षेत्रातील लोकांची शुक्रवारी व शनिवारी नोंदणी झालेली आहे.
वास्को स्थानकातून पार्सल रेल्वे सेवा सुरू
दरम्यान, दक्षिण पश्चिम रेल्वे काल शनिवारपासून जीवनावश्यक मालवाहतुक सुरू केली आहे. वास्को द गामा स्थानकापासून कोलकातातील हावडा रेल्वे स्थानकापर्यंत प्रत्येक रेल्वे स्थानकात माल पार्सल लोडींगची सुविधा या रेल्वेमार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही रेल्वे उद्या सोमवारी हावडा येथे पोहोचणार आहे. दक्षिण पश्चिम मार्गावरील मडगाव, हुबळी, गदग, कोप्पल, होसपेट, बेल्लारी, गुंतकल, गुंटूर, विजयवाडा इत्यादी एकोणीस रेल्वे स्थानकांवर ही पार्सल रेल्वे सेवा थांबणार आहे. कोरोनाविरूध्दच्या लढय़ात साहाय्य करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









