गोव्यातील सुविधांशी तुलना होऊच शकत नाही आमदार सुदिन ढवळीकर यांची टीका
प्रतिनिधी/ फोंडा
आम आदमी पार्टी सध्या गोव्यात दिल्लीतील जनतेला मिळणाऱया सुविधांवर जे बोलत आहे, ते निरर्थक फसवी चर्चा असून गोव्यातील जनतेला मिळणाऱया सुविधांशी त्याची तुलना होऊच शकत नाही. कोळसा वाहतुकीच्या प्रश्नावर गोव्यात गळा काढणारा हा पक्ष दिल्लीतील प्रदूषणावर मात्र बोलत नाही, अशी जोरदार टीका मगो नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
गोवा सरकार गृह आधार, लाडली लक्ष्मी यासह निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्ती या सर्व घटकांसाठी विविध योजनांखाली दरमाही आर्थिक आधार देत आहे. या सर्व सुविधा दिल्लीतील जनतेला मिळत नाहीत. आम आदमी पार्टीची दिल्लीतील फुकट वीज योजना ही पहिल्या काही युनिटसाठी विशिष्ट स्तरातील नागरिकांनाच मिळत आहे. मध्यमवर्गीय व त्यापुढील गटात येणाऱया ग्राहकांकडून मोफत विजेवरील ही आर्थिक तूट भरुन काढली जात आहे.
दिल्लीत पाणी बिलही गोव्यापेक्षा अधिक
पाण्यावर प्रति क्युबिक मिटरमागे गोमंतकीय जनतेकडून 3 रुपये 25 पैशांपासून जास्तीतजास्त 25 रुपयांपर्यंत पर्यंत बिले आकारली जातात. या उलट दिल्लीत पाण्याचे हे दर रु. 25 च्यापुढे सुरु होतात, असे ढवळीकर म्हणाले. आपण मुख्यमंत्री किंवा सरकारच्या बाजूने हे बोलत नसून यापूर्वी राज्यात ज्या विविध जनकल्याणकारी योजना आखल्या गेल्या त्यावेळी मनोहर पर्रीकर व दिगंबर कामत यांच्या सरकारमधील एक घटक असल्याने हे बोलावे लागत असल्याचे ढवळीकर म्हणाले.
आपसोबत चर्चेला बसून मंत्र्यांनी पत घालवली
दिल्लीतून आपचा एखादा प्रतिनिधी गोव्यात येऊन सरकारला जाहीर चर्चेसाठी आव्हान देतो व येथील मंत्री त्यांच्यासोबत चर्चेला बसतात ही सरकारची नाचक्की आहे. राज्यातील प्रश्नांवर अशा लोकांबरोबर चर्चेला बसून मंत्र्यांनी आपली पत घालवल्याचीही टीका ढवळीकर यांनी केली आहे.
भाजपा व आम आदमी पार्टी हे एकच आहेत, असे गोवा फॉरवर्ड म्हणतो. तसे असल्यास जनतेने आता गांभीर्याने विचार करण्याची गरज असून कोळसा वाहतूक, खाणीचा प्रश्न व राज्यातील अन्य मुद्दय़ांवर मगो पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मगो पक्षाने यापूर्वी 17 वर्षांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने जनतेचे सरकार चालविले तेच सरकार पुन्हा देण्यास मगो पक्ष समर्थ असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.









