ऑनलाईन टीम/ तरारून भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. यामुळे मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले.
दरम्यान या घटनेनंतर भारतीय किसान युनिअनच्या सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग रोखल्याबद्दल सहकारी आंदोलकांचे आभार मानले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बीकेयूचे नेते सुरजीत सिंह फूल आंदोलकांना संबोधित करताना “तुम्ही दाखवलेल्या ताकदीमुळे मोदी फिरोजपूरमध्ये रॅली काढू शकले नाहीत”.आपण रॅलीपासून १० ते ११ किमी अंतरावर रस्ता अडवण्यात यशस्वी झालो आहोत. याच भाजपाने आपल्यावर पाण्याचा मारा केला होता आणि रस्त्यावर कुंपण लावलं होतं. पण आता आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं आहे”, असे तो म्हणत आहे.
पंतप्रधान मोदी पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले
सुरक्षा व्यवस्थेतील मोठय़ा त्रुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंजाब दौरा अर्धवट सोडावा लागला. बुधवारी भठींडा येथून हुसैनीवाला राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जात असताना वाटेत एका फ्लायओव्हरवर त्यांची कार 20 मिनिटे अडकून पडली. या रस्त्यावर त्याचवेळी काहीजण आंदोलन करत होते. त्यामुळे रस्ता अडवला गेला होता. पंजाब पोलिसांनी वेळीच कारवाई करुन रस्ता मोकळा न केल्याने जवळपास 20 मिनिटे कार रस्त्यावरच थांबून होती. यानंतर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा रद्द करण्यात आली, तर दौरा अर्धवट सोडण्यात आला. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे. कारण निदान मी जिवंत राहिलो, अशी खोचक टिप्पणी नंतर पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या अधिकाऱयांना उद्देशून केली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे स्पष्ट केले. पंजाब सरकारच्या ढिलाईमुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पाठवा असा आदेश केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारला दिला आहे. या प्रकाराची केंद्राकडून चौकशीही केली जाणार आहे.