क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाचा 68 धावांनी, बीडीके फौंडेशन हुबळी संघाने विजया क्रिकेट अकादमीचा 9 गडय़ांनी तर श्री सिद्धारूढ स्वामी हुबळी संघाने सीसीके धारवाड संघाचा 102 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. संतोषकुमार इरापूर (सिद्धारूढ), नागेंद्र पाटील व केतज कोल्हापुरे यांना विभागून (आनंद अकादमी), प्रियंजन यादव (बीडीके) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आरआयएस मैदान हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमी संघाने 50 षटकात 6 बाद 327 धावा केल्या. नागेंद्र पाटीलने 14 चौकारासह नाबाद 116, केतज कोल्हापुरेने 6 षटकार व 10 चौकारासह 104 धावा करून दोघांनीही शतके नोंदवली. त्यांना किसन मेघनराजने 39, राहुल नाईकने 25, पियुष गोहलोतने 19 धावा करून सुरेख साथ दिली. हुबळी अकादमीतर्फे पुनित बसवाने 2 तर सुजल पाटील व मनिष एम. एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 48.1 षटकात 260 धावात आटोपला. मनिकांत बुकीटगारने 8 चौकारासह 82, इम्रान मकाराबीने 40, पुनित बसवाने 36, आकाश कट्टीमणी व जोसेफ अण्णापिल्ले यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. आनंदतर्फे ओंकार देशपांडेने 2 तर वाहिद, केतज कोल्हापुरे, सचिन, आदित्य व किसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केजीजी हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 49.2 षटकात सर्व बाद 288 धावा केल्या. संतोषकुमार इरापूरने 61, अजय घोडकेने 56, सतिश व्ही.ने 33, विष्णु राजपुरमने 24, अभिषेक देशपांडे व यल्लाप्पा काळे यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. सीसीके हुबळीतर्फे शामसुंदर, राजा, राजवीर यांनी प्रत्येकी 2, श्रीकेश शेट्टी, श्रेयश मुर्डेश्वर व के. रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीके स्पोर्ट्स क्लब धारवाड संघाचा डाव 32.3 षटकात 186 धावात आटोपला. यश कुरबरने 46, राजवीर वादवाने 39, पी. रघुवीरने 34, के. रेहमानने 21 धावा केल्या. सिद्धारूढतर्फे यल्लाप्पा काळे व अभिषेक बेलकेरी यांनी प्रत्येकी 3 तर संतोषकुमार व सुरेश कोन्नूर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमीने 26.2 षटकात सर्व बाद 86 धावा केल्या. मयंकराज पाटीलने 18, रोशन बेकवाडकर व शुभम गावडे यांनी प्रत्येकी 10 तर मनोज सुतारने 12 धावा केल्या. बीडीकेतर्फे प्रियंजन यादवने 11 धावात 5 तर दऱयाप्पा व अब्दुल करीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके हुबळी संघाने 17.5 षटकात 1 बाद 87 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. पवन नागेशने 7 चौकारासह नाबाद 46, अब्दुल करीमने नाबाद 17, प्रियंजन यादवने 16 धावा केल्या.









