नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आधार कार्डाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यांच्या घटनापीठाने फेटाळली आहे. आधार कार्ड पद्धती घटनात्मकदृष्टय़ा वैधच असल्याचा निर्वाळा घटनापीठाने 4 विरूद्ध 1 अशा बहुमताने दिला. केवळ न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी विरोधी निर्णय दिला.
आधारची घटनात्मक वैधता मान्य करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिला होता. मात्र, काही कामांसाठी आधार कार्डाची सक्ती करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. बँक खात्यांना आधारशी जोडणे ऐच्छिक असल्याचा निर्वाळाही देण्यात आला होता. तथापि प्राप्तीकर विवरणपत्र आधारशी जोडण्याचा सरकारचा आदेश वैध मानण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका 2019 मध्ये न्यायालयात सादर करण्यात आली होती.
चंद्रचूड यांचे मत
आधारसंबंधी आणखी एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात जोपर्यंत निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत या पुनर्विचार याचिकेवर निर्णय देण्यात येऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले. या दुसऱया प्रकरणात आधारची वैधता अमान्य करण्यात आली तर पुनर्विचार याचिकेवर दिला गेलेल्या निर्णयाचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विरोधी निर्णय दिला. मात्र, नियमाप्रमाणे बहुमताचा निर्णयच ग्राहय़ मानला जाणार आहे.









